मुंबई – दीड वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच डॉक्टर म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आहेत. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची शैक्षणिक फी माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (सेंट्रल मार्ड)च्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे-पाटील उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून निवासी डॉक्टर्स रात्रंदिवस कोविड -19 परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांची शैक्षणिक फी माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून, याबाबत तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल. वैद्यकीय संचालकांमार्फत तसा प्रस्ताव सादर करून वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.
आपल्या घरापासून दूर राहत अनेक विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतिगृहांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळेच वसतिगृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक याबाबत माहिती घेतील, असेही देशमुख यांनी सांगितले.