पुणे – क्रांती दिनाचे औचित्य साधून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि सेंटर फॉर अॅड्व्होकसी अँड रिसर्च यांच्या पुढाकारातून निर्मित राज्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर हेल्प-डेस्कचे लोकार्पण करण्यात आले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आणि ट्रान्सजेंडर प्रतिनिधींच्या हस्ते या हेल्प-डेस्कचे लोकार्पण करण्यात आले.
विश्रांतवाडी येथे या हेल्प-डेस्कची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी सेंटर फॉर अॅड्व्होकसी अँड रिसर्चचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक आनंद बाखडे, प्रितेश कांबळे, पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उप समाज विकास अधिकारी राजेंद्र मोरे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती लोखंडे, पुणे महापालिकेचे समाज सेवक संदिप कांबळे, जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंटचे जॉर्ज स्वामी, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या ऐश्वर्या पांडव, आशिका पुणेकर, मोनिका पुणेकर आदी उपस्थित होते.
शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना व आरोग्यविषयक योजना आणि त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पारलिंगी (ट्रान्सजेंडर) नागरिकांना एकाच छताखाली सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी एक बोर्ड असावे, यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला व त्यातून ट्रान्सजेंडर बोर्डाची निर्मिती झाली. याचा पुढचा टप्पा म्हणजे हे हेल्प-डेस्क आहे.
ट्रान्सजेंडर नागरिकांसोबतचा भेदभाव रोखणे यासाठी प्रत्येकाने आपल्या पातळीवर प्रयत्न करायला हवा. हेल्पडेस्कची निर्मिती हे त्यासाठीचे महत्वाचे पाऊल आमच्या विभागाच्यावतीने उचलले आहे. अधिकाधिक ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळखपत्र मिळवून देण्यासाठी व त्या माध्यमातून त्यांना विविध शासकीय विभागांच्या योजना मिळवून देण्यासाठी हेल्प-डेस्कच्या माध्यमातून समन्वय साधला जाईल, असे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले. या हेल्पडेस्कमध्ये शुभांगी चौघुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदत व मार्गदर्शन मिळवण्यासाठी या हेल्पडेस्कचा हेल्पलाइन नंबर ९१५६८८८३६० जारी करण्यात आलेला आहे.