नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषे जवळच्या संवेदनशील सीमाभागातले सहा मुख्य पूल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला अर्पण केले. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे पूल सीमा रस्ते संघटनेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहेत. तसेच अतिशय धोकादायक भूभाग व हवामान अशा परिस्थितीतही पूल उभारण्याचे महत्वाचे काम केल्याबद्दल सिंग यांनी “बीआरओ’च्या तंत्रज्ञांचे अभिनंदन केले.
यापैकी दोन पूल कथुवा जिल्हयात तारनाह नाला येथे आणि चार पूल जम्मूतील अखनूर जिल्ह्यात अखनूर-पालनवाला रस्त्यावर बांधण्यात आले आहेत. एकंदर तीस ते तीनशे मीटर लांबीच्या या पूलांच्या बांधणीचा संपूर्ण खर्च 43 कोटी रुपये इतका झाला आहे. सर्व जगात कोविड-19 मुळे एकमेकांपासून दूर राहण्यावर भर दिला जात असताना लोकांना जोडणाऱ्या या पुलाचे उद्घाटन करायला मिळणे, हा एक सुखद अनुभव आहे, असेही ते म्हणाले.
सीमाभागात रस्ते व पूल यांच्या उभारणीत सीमा रस्ते संघटनेच्या तत्परतेमुळे दुर्गम प्रदेशांपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे. देशाच्या सीमा भागातील रस्त्यांना फक्त धोरणात्मक महत्व नसते, तर दुर्गम प्रदेशांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. लष्करी दलांची धोरणात्मक गरज किंवा आरोग्य, शिक्षण, व्यापार इत्यादी क्षेत्रांशी संबंधित विकासकामे कनेक्टिविटीमुळेच पूर्ण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
आधुनिक रस्त्यांची तसेच पुलांची उभारणी यामुळे या प्रदेशात समृद्धी येईल. जम्मू-काश्मीरमधील नागरिक आणि लष्करी दल यांच्या गरजा लक्षात ठेऊन इतर विकासकामेही हळूहळू हातात घेतली जात आहेत. वेळोवेळी त्यांची घोषणा केली जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे एक हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारले जात आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
गेल्या दोन वर्षात आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर करत “बीआरओ’ने 2,200 किलोमीटरहून जास्त भूभाग कापून काढत साधारण 4,200 किलोमीटरचे रस्ते आणि 5,800 मीटर लांबीचे कायमस्वरूपी पूल बांधले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या सहा पुलांच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय पूर्वोत्तर राज्य विकास (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, वैयक्तिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग, जम्मूचे खासदार जुगल किशोर शर्मा हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते.