पुणेः पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) 2025 उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. राज्यातील युवकांना मनोरंजन क्षेत्रात मार्गदर्शन मिळावे यासाठी शासन अनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रातील शैक्षणिक (सेंटर ऑफ एक्सलंस) संस्था उभारणार असून, त्यामध्ये विविध क्षेत्रातील जगातील तज्ञ येऊन त्यांच्याद्वारे उच्च शिक्षण दिले जाणार असल्याची घोषणा यावेळी बोलताना शेलार यांनी केली. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दिमाखदार पद्धतीने उद्घाटन सोहळा पार पडला.
राज कपूर यांची यावर्षी जन्मशताब्दी आहे. शोमन राज कपूर ही यावर्षीच्या महोत्सवाची थीम असून राज कपूर यांचे पुण्याशी खास नाते होते. दरवर्षी जगभरातील उत्तोमोत्तम सिनेमे पुणे चित्रपट महोत्सवात दाखवले जातात आणि नागपूर, लातूर आणि आता ‘नॉर्थ अमेरिका मराठी फिल्म फेस्टिव्हल’, इथे सॅटेलाईट महोत्सव होत आहेत. त्यासाठी ‘कान महोत्सवा’ने, पुणे चित्रपट महोत्सवाला खास बोलावले होते. यावर्षी जगभरातून १५०० चित्रपट आले होते. त्यातून १५० चित्रपट निवडण्यात आले असल्याचे पिफचे संचालक डॅा. जब्बार पटेल यांनी सांगितले.
महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय ज्यूरी मार्को बेकिस (चिली-इटालियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), मार्गारिवा शिल (पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षिका), पेट्री कोटविका (फिनिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), तामिन्हे मिलानी (इराणी चित्रपट दिग्दर्शक), जॉर्जे स्टिचकोविच (सिनेमॅटोग्राफर सर्बिया), सुदथ महादिवुलवेवा (श्रीलंकन चित्रपट दिग्दर्शक), उर्वशी अर्चना (दक्षिण भारतीय अभिनेत्री), अनिरुद्ध रॉय चौधरी (भारतीय चित्रपट दिग्दर्शक) यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या ठिकाणी पाहता येणार चित्रपट
१३ ते २० फेब्रुवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’ होत आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.