सातारा – ऐन उमेदीत रग असताना राष्ट्रीय पातळीवरील कामगिरीसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या मल्लांच्या आर्थिक विवंचना वृद्धावस्थेत वाढत जातात. अशा नामवंत मल्लांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने धोरण आखायला हवे, अशी अपेक्षा विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघ यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन छ. शाहू क्रीडा संकुलात झाले. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे, जिल्हा तालीम संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबराव पवार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, दीपक पवार, सुधीर पवार उपस्थित होते. रामराजे म्हणाले, सातारा शहरात प्रदीर्घ कालखंडानंतर महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा होत आहे. दिवंगत पैलवान श्रीरंग जाधव हे फलटणचे होते. नंतर ते माहुलीला आले. कुस्तीची ही परंपरा जपली पाहिजे. उमेदीच्या काळात खेळणारा मल्ल वृद्धावस्थेत आर्थिकदृष्ट्या जर्जर होतो.
या मल्लांच्या पुनर्वसनाचे धोरण निश्चित व्हायला हवे. ना. बाळासाहेब पाटील यांनी यात लक्ष घालावे. बाळासाहेब लांडगे आणि सातारचे नाते जुने असून, त्यांचे प्रेम कमी झाले आहे. ते पुण्यातही भेटत नाहीत, अशी कोपरखळी रामराजेंनी मारली. ना. देसाई म्हणाले, 1962 नंतर आज 64 वे अधिवेशन शरद पवार यांच्या मान्यतेने मिळाले हा जिल्ह्याचा बहुमान आहे. साताऱ्याच्या कुस्ती क्षेत्राची वेगळी ओळख आहे. ऑलिम्पिक पदकविजेते मल्ल खाशाबा जाधव हे याच जिल्ह्यातले होते. त्यांच्या स्मारकासाठी सर्वांनी प्रयत्न केले. तालीम संघाची इमारत त्यावेळी बाळासाहेब देसाई यांनी बांधून दिली. साहेबराव पवार यांचे तालीम संघावर बारकाईने लक्ष आहे. या तालीम संघाचा नावलौकिक आपण सर्व मिळून वाढवूया.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्हा तालीम संघाकडून महाराष्ट्र केसरीच्या यजमानपदाची मागणी होत होती. शरद पवार यांच्यामुळे ही स्पर्धा साताऱ्यात होत आहे. ही मोठी स्पर्धा आहे. ती यशस्वी करण्यासाठी दीपक पवार व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. ही स्पर्धा सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात होत आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साहेबराव पवार यांनी स्वागत केले. कुस्तीगीर परिषदेचे सचिव सुधीर पवार यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब लांडगे यांनी आभार मानले.