करतारपूर कोरिडॉरचे उद्‌घाटन 9 नोव्हेंबरला- इम्रान खान

लाहोर – बहुप्रतिक्षित करतारपूर कॉरिडोरचे उद्‌घाटन पाकिस्तान 9 नोव्हेंबर रोजी करेल, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी केली. करतारपूर प्रकल्पातील काम अंतिम टप्प्यात आहे आणि 9 नोव्हेंबर, 2019 रोजी सर्व लोकांसाठी खुले होणार आहे.

पाकिस्तान जगभरातील सर्व शीखांसाठी आपले दरवाजे उघडण्यास तयार आहे, असे इम्रान खान यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 12 नोव्हेंबर रोजी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त हा कॉरिडोर खुला असेल की नाही याबाबतची संदिग्धता त्यामुळे संपली आहे.

पाकिस्तानमध्ये धार्मिक पर्यटन वाढत आहे, पूर्वी बौद्ध भिक्‍खूंनी धार्मिक विधीसाठी विविध ठिकाणी भेट दिली आणि त्यानंतर करतारपूर कॉरिडोर उघडत आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. “आतापर्यंत कोणतीही तारीख निश्‍चित केलेली नाही.’ असे 10 ऑक्‍टोबर रोजी पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी सांगून उद्घाटनाच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण केला होता.

हा प्रस्तावित कॉरिडॉर पाकिस्तानातील कर्तारपूरमधील दरबार साहिब आणि पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक मंदिराशी जोडेल. त्यामुळे भारतीय यात्रेकरूंना कर्तारपूरच्या यात्रेसाठी व्हिसामुक्‍त प्रवेश मिळू शकणार आहे. पाकिस्तान भारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत कॉरिडोर बनवित आहे, तर पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंतचा दुसरा भाग भारत बांधणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.