समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण

रमेश जाधव
मुंबई -महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नागपूर या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे लोकार्पण आता 15 ऑगस्टला करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच जाहीर केले आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारने या महामार्गाला गती देण्याचे काम केले.
त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे नामकरण करण्यात आलेल्या समृद्धीच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे लोकार्पण आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावे यासाठी स्वतः ठाकरे प्रयत्नशील होते. मात्र, समृद्धीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने 1 मे कामगार दिनी होणारे लोकार्पण पुढे ढकलले. साहजिकच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शिर्डी-नागपूर या मार्गाचे लोकार्पण होऊ शकले नाही. उद्धव ठाकरे यांनी शेलुबाजार वाशिम ते नागपूर या टप्प्याचे 1 मे च्या मुहूर्तावर लोकार्पण कण्यासाठी प्रयत्न केले होते;
परंतु वाशिम ते नागपूर दरम्यानच्या वायफळ वन्य विभागातील बुटीबोरी नजीकच्या ओव्हरपासचा काही भाग ढासळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर पॅकेज एक अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील शिवमडका-खडकी आमगाव येथे बांधकाम कोसळले होते, त्यामुळे 1 मे 2022 चा मुहूर्त महाविकास आघाडीला गाठता आला नाही. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या सुमारे 701 किलोमीटर मार्गीकेचे काम 16 टप्प्यांत विभागले असून, वर्धा आणि इगतपुरीमधील भुयारी मार्गासह इतर कामांचेही होत असलेले काम विक्रमी वेळेत पूर्ण होत असल्याचे एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. संपूर्ण समृद्धी महामार्ग खुला होण्यास 2023 साल उजाडणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाच्या कामकाजाची धुरा विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सांभाळत आहेत. शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 कि लोमीटर मार्गादरम्यानचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून लोकार्पण 15 ऑगस्टला होणार आहे.
मुंबई ते नागपूर या 701 कि. मी. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात शिर्डी ते नागपूर 520 कि.मी., दुसऱ्या टप्प्यामध्य 103 कि. मी. ज्यामध्ये इगतपुरी आणि नागपूरमधील विस्ताराचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व मार्ग 2023 पर्यंत खुल्या करण्यात येणार आहे.
व्ही. आर. सातपुते
अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी, नाशिक





