सातारा -येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात करोना टेस्टिंग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार अत्याधुनिक अशा लॅबची उभारणी करण्यात आली असून या लॅबचे उदघाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या लॅबममधून रोज 380 नमुने तपासले जाणार आहेत.
याप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
साताऱ्यात मध्यवर्ती ठिकाणी करोना टेस्टींग लॅब असावी अशी सर्वांची इच्छा होती. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर आज करोना टेस्टिंग लॅबचे उदघाटन झाले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी कराडमध्ये आजपासून लॅब कार्यान्वित होईल असे सांगितले होते. या लॅबममधून रोज 380 जणांचे नमुने तपासले जाणार असून यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या लॅबमुळे करोना झालेल्या व्यक्तीचा अहवाल 24 तासांच्या आत मिळणार आहे.