Satara | वातानुकूलित इ- बसचे देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा, (प्रतिनिधी)- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात वातानुकूलित इ- बसचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, बसच्या उद्घाटनानंतर सातारा- स्वारगेट मार्गावर एक इ- बस प्रवाशांना घेऊन रवाना झाली.
या कार्यक्रमास महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे, अभियंता विकास माने, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, सातारा आगार व्यवस्थापक रत्नकांत शिंदे, लेखा अधिकारी तेजस नवले, प्रादेशिक अभियंता इंगवले, दत्ताजीराव मोरे, आदेश माने, रेश्मा गाडेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात नऊ मीटर सेवा प्रकारातील ३४ आसन क्षमता असलेल्या वातानुकूलित पाच ई- बस सातारा- स्वारगेट (विनावाहक विनाथांबा) मार्गावर प्रवासी सेवेकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आठवडाभरात उर्वरित पाच बस उपलब्ध होणार आहेत. उद्घाटनानंतर पालकमंत्री देसाई यांनी बसमध्ये बसून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून माहिती घेतली. सातारा- स्वारगेट मार्गावर इ- बसच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्याने प्रवाशांना आरामदायी व सुखकर प्रवास करता येणार आहे.
साताऱ्यात नऊ चार्जिंग पॉइंट
पहिल्या टप्प्यात दहा चार्जिंग बस उपलब्ध झाल्या असून या बसच्या चार्जिंगसाठी सातारा येथे नऊ चार्जिंग पॉइंट काढण्यात आले आहेत.
त्यामध्ये प्रत्येक बस १८० किलोमीटर धावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखीन इ- बसची संख्या वाढविण्यात येणार असून त्यानंतर आणखी चार्जिंग पॉइंट वाढवण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.





