ग्रंथदिंडीने होणार साहित्य संमेलनाचा शुभारंभ

उस्मानाबाद : उस्मानाबादेत संत गोरोबाकाका साहित्य नगरीत आयोजित 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त गुरुवारी शहरात दीडशे प्रसिध्द साहित्यीक दाखल होणार आहेत.

संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो दाखल झाले आहेत. संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना.धो.महानोर मावळत्या अध्यक्षा डॉ.अरूणा ढेरे आज सायंकाळी दाखल होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी दिली.

साहित्य संमेलनानिमित्त शहरात नवा उत्साह निर्माण झाला आहे. शहरातील मुख्यरस्त्यावरील संरक्षक भिंती विविध चित्रांनी रंगवल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या साहित्यीकांची निवास व्यवस्था  हॉटेल आणि शासकीय विश्रामगृहात करण्यात आली आहे.

विविध राज्यातून पुस्तकांचे अडीचशे स्टॉल शहरात दाखल झाले आहेत.
हे संमेलन उस्मानाबाद शहरातील जि.प.कन्या प्रशालेच्या मैदानावर होत आहे. या ठिकाणाला संत गोरोबा काका साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे.

ग्रंथदिंडीने होणार शुभारंभ

उस्मानाबाद शहरात उद्या शुक्रवारी भव्य ग्रंथदिंडी निघणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी संमेलनस्थळी पोहोचणार आहे. यामध्ये 25 ते 30 पथकांचा समावेश असणार आहे. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पालखीमध्ये ग्रंथ ठेवून या दिंडीला प्रारंभ होणार आहे.

तसेच ग्रंथदिंडीमध्ये दीड हजारावर शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर 8 विविध लेझीम पथके, 4 झांज पथके, 2 वारकरी मंडळाचे पथके, वेशभुषा पथके, 9 सजीव देखावे , 1 आदिवासी नृत्य पथक, ओडीसी नृत्य पथक आदींचाही यामध्ये सहभाग राहणार आहे.

ढेरे करणार ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ
प्रारंभी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ होणार आहे.

यावेळी आयोजित साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, साहित्यिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.