पंतप्रधानांच्याच हस्ते उद्‌घाटन

पुण्यातील करोनाचे निर्बंध शिथिल करावेत

पुणे – करोनाकाळात मजुरांच्या उपलब्धतेसह इतर अडचणी असतानाही महामेट्रो कंपनीने पुण्यातील मेट्रा प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरू ठेवले. या प्रकल्पातून स्थापत्यशास्त्र व तंत्रज्ञानाच्या कामाचा उत्तम नमूना पहायला मिळणार आहे. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रकल्प नाही, तर तो पुणेकरांचा आहे.

 सरकार येतात अन्‌ जातात त्यामुळे प्रकल्पावरून श्रेयवादाचा विषय करण्याचे काहीच कारण नाही. या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण होणार असून त्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्तेच होणार आहे, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवाजीनगर येथे सिव्हील कोर्टाजवळ पुणे मेट्रोच्या कामाची फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहर सुधारणा समिती अध्यक्ष आनंद रिठे, नगरसेवक योगेश मुळीक आदी उपस्थित होते.
2016 मध्ये राज्य व केंद्र शासनाने मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली.

2017 मध्ये महामेट्रो कॉर्पोरेशन कंपनी स्थापन केली. प्रकल्पाचे 60 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तीन टीबीएमचे काम 100 टक्‍के झाले आहे. परीक्षण झालेल्या कॉरिडॉर हा ऑक्‍टोबरपर्यंत सुरू होणार आहे. शिवाजीनगर येथेही मल्टी मॉडेल हब झाले पाहिजे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. देशातील इतर ठिकाणच्या प्रकल्पांचा विचार करता पुण्यात मेट्रोचे काम वेगाने होत आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अजित पवार हे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री असल्याने कोथरुड येथील मेट्रोची चाचणी त्यांच्या हस्तेच झाली. त्यामुळे यात श्रेयवादाचा काहीच प्रश्‍न येत नाही. प्रकल्पासाठी केंद्र शासनाने निधी दिला असल्याने त्याचे उद्‌घाटन मात्र मोदी यांच्याच हस्ते होणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. केंद्र शासनाने निधी, परदेशी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. भविष्यात मेट्रोच्या इतर वाढीव प्रकल्पांना केंद्र शासनाकडून मान्यता व निधी मिळेल यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत असून पोलिसांनी त्यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. पोलिसांनी सक्रियपणे काम करावे. पोलीसच गुन्हे करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे, असे मतही फडणवीस यांनी व्यक्‍त केले.

करोना निर्बंधाचे निकष राज्य शासनाने ठरविले आहेत. पुण्याच्या महिन्याभराचा करोनाचा दर हा 5 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. व्यापारी, दुकानदार अडचणीत असल्यामुळे ते निर्बंध पाळण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे शासनाने पुणेकर, व्यापारी, उद्योग या सर्वांना निर्बंध शिथिल करून दिलासा देण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.