Uttar Pradesh – लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात जवळपास एकमताने मुस्लिम मते मिळाली आणि दलितांनीही या विरोधकांच्या आघाडीची ताकद वाढवली.
यशप्राप्तीचा हाच ट्रेंड उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहावा अशी समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेस या इंडिया आघाडीतील दोन्ही मित्रपक्षांची अपेक्षा आहे.
तथापि, ज्या मतदारांनी म्हणजे मुस्लिम आणि दलित त्यांना लोकसभेत बळ दिले ती मतपेढीच पुढील वाटचालीत या दोन्ही पक्षांसाठी अडथळा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यात ज्या दहा विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे, त्यामध्ये गेल्या वेळी जिंकलेल्या पाच जागांवर सपाचा दावा असणे स्वाभाविक आहे, पण मीरापूर, माळवण आणि फुलपूर या जागाही कॉंग्रेससाठी सोडण्याची सपाची तयारी नाही.
त्याचे कारण या जागांवर असलेली दलित आणि मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या. कॉंग्रेसलाही २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मैदान तयार करायचे असल्यामुळे प्रदेश कॉंग्रेसची या जागा सोडण्याची मुळीच इच्छा नाही.
उत्तर प्रदेशात आंबेडकर नगरच्या कटहारी, मिर्झापूरचे माझवान, फैजाबादचे मिल्कीपूर, मुझफ्फरनगरचे मिरापूर, कानपूर नगरचे सिसामऊ, मैनपुरीचे करहाल, प्रयागराजचे फुलपूर, अलिगढचे खैर, मुरादाबादचे कुंडरकी आणि कुंडरकी येथे पोटनिवडणूक होणार आहे.
भारतीय जनता पार्टीकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीची कमान हाती घेत मंत्र्यांना प्रभारी बनवून मैदानात उतरवले आहे, तर सपा आणि काँग्रेस पुन्हा युती करून भाजपशी मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत सपासोबत काँग्रेसची स्थितीही सुधारली आहे आणि पक्षाने एका जागेवरून सहा जागांपर्यंत मजल मारली आहे.
त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी, मागील निवडणुकीत सपाने ज्या पाच जागा जिंकल्या होत्या त्या पाच जागांवर सपाच्या उमेदवारांनीच लढावे आणि भाजपने ज्या तीन जागा जिंकल्या होत्या तेथे,
तसेच एनडीएतील त्यांचा सहयोगी पक्ष आरएलडी आणि निषाद पक्षाने जिंकलेली प्रत्येकी एक जागा अशा पाच उर्वरित जागा कॉंग्रेस पक्ष लढवेल, असा प्रस्ताव काँग्रेसकडून यापूर्वीच ठेवण्यात आला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपाने केवळ गाझियाबाद आणि खैर या दोन जागा काँग्रेसला देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, काँग्रेस त्यासाठी तयार नाही.
राज्यात काँग्रेसमुळेच दलित मतदार विरोधी आघाडीत सामील झाल्याचा दावा केला जात आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय म्हणतात की, प्रत्येक जागा आमच्यासाठी महत्त्वाची आहे.
सपाच्या प्रस्तावावर हायकमांड निर्णय घेईल, परंतु गेल्या निवडणुकीत भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांनी ज्या पाच जागा जिंकल्या होत्या त्या राज्याने राष्ट्रीय नेतृत्वाला प्रस्तावित केल्या आहेत. सर्व दहा जागांसाठी आमची तयारी सुरू असली तरी करारात सन्मानजनक जागावाटप काँग्रेसला हवे आहे.