लखनौ : उत्तरप्रदेशात नो हेल्मेट, नो फ्युएल धोरण राबवले जाणार आहे. त्यानुसार, हेल्मेट असेल तरच दुचाकीस्वारांना पेट्रोल उपलब्ध होईल. रस्ते अपघातांमधील जीवितहानी टाळण्याच्या उद्देशातून संबंधित धोरणाचा आग्रह धरण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशचे परिवहन आयुक्त ब्रजेश नारायण सिंह यांनी नुकताच पेट्रोल पंप चालकांसाठी एक आदेश जारी केला. दुचाकी चालवणाऱ्याने आणि पाठीमागे बसणाऱ्याने हेल्मेट परिधान केले नसल्यास पेट्रोल दिले जाऊ नये, असे त्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. सिंह यांनी आदेशाच्या प्रती सर्व ७५ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.
दुचाकीस्वारांशी संबंधित अपघातांमध्ये बहुतांश मृत्यू हेल्मेटचा वापर केला जात नसल्याने होतात. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी आणि रस्ता सुरक्षेच्या निश्चितीसाठी धोरण आणले गेले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यामध्ये रस्ता सुरक्षेशी निगडीत विषयांचा आढावा घेण्यात आला.
रस्ता अपघातांमुळे उत्तरप्रदेशात दरवर्षी २५ ते २६ हजार जणांना जीव गमवावा लागतो याकडे योगींनी लक्ष वेधले, असे सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे. हेल्मेटशी संबंधित धोरण काटेकोरपणे राबवण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.