उत्तर प्रदेशात काँग्रेस, मायावतींकडून सॉफ्ट हिंदुत्वाचा अंगीकार

पेट्रोल दरवाढ, महागाईचा मुद्दा मागे पडून मंदिर भेटींवर नेत्यांचा भर

लखनौ – दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन, केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी घालून चिरडणे, वीजटंचाई, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ, महागाई हे सर्वसामान्यांचे प्रश्न मागे पडून विधानसभेच्या निवडणुकीत आता धार्मिक अनुनयाला महत्त्व आले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात राज्यात काय विकासकामे झाली यावरून जनतेचे दुसरीकडे लक्ष वेधण्यात सत्ताधाऱ्यांना यश येत असल्याचे दिसू लागले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेची पाच महिन्यांवर येऊन ठेपलेली निवडणूक म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील आतापर्यंतचा घनघोर रणसंग्राम ठरणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.

सर्वच पक्षांना किमान सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने पावले टाकण्यास भाजपच्या हार्ड हिंदुत्वाने भाग पाडलेले आहे. त्यामुळेच बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी काही दिवसांपूर्वीच आपण सत्तेवर आल्यावर अयोध्या, वाराणसी आणि मथुरेत चालू असणारी थांबवणार नसल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वाराणसीतील सभेची सुरवात दुर्गा सप्तशतीने केली.

अगदी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची आजपासून सुरू झालेली विजय यात्रा कानपूरमधील गंगेच्या किनाऱ्यावरून सुरू झाली. त्याआधी सहराणपूर येथील सभेत बोलताना त्यांनी गीतेतील संदर्भ दिले. गेल्या काही महिन्यांपासून अखिलेश यादव यांनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावलेला आहे.

चित्रकूटमधील कामदगिरी मंदिरात ते गेले होते. फरुख्खाबादमधील विमलनाथ मंदिरात त्यांनी हजेरी लावली. श्रावस्ती येथील बुद्ध मंदिरात जाऊन आले. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरणाऱ्या आम आदमी पक्षानेही अयोध्येतून प्रचार मोहिमेला सुरवात केलेली आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते गुजरातमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा अंगीकार केलेला आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही भाजपच्या सरकराने अयोध्या, वाराणसी, मथुरा येथे सुरु केलेली कामे थांबवणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावलेला होता. प्रियांका यांनीही त्यांच्या रविवारच्या वाराणसीतील सभेआधी तेथील मंदिरांमध्ये जाण्याचा कार्यक्रम केला. 

संध्याकाळी वाराणसीत झालेल्या किसान न्याय रॅलीमध्ये प्रियांका यांनी गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर चंदन आणि कुंकुवाचा टिळा, उजव्या हातात पवित्र गंडे बांधले होते. त्यादिवशी त्यांनी उपवास केला होता आणि सभेची सुरवात त्यांनी दुर्गा सप्तशतीमधील पाठ म्हणून केली. सभेला सुरवात करण्यापूर्वी त्यांनी जय माता दी अशी घोषणाही दिली.

प्रियांका गांधी यांच्या या नव्या अवताराविषयी बोलताना या सभेची सगळी सूत्रे सांभाऴणारे काँग्रसचे चिटणीस राजेश तिवारी म्हणाले, मंदिराबाबत भाजपवाले जे करतात तो सगळा प्रसिद्धीचा भाग असतो. काँग्रेसचे नेते अगदी इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या काळापासून मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळांना भेटी देतात.

समाजवादी पक्षाच्या नेत्या जुही सिंग यांच्या मते मंदिरात जाण्यासाठी भाजपवाल्यांना सोबत कॅमेरा लागतो. त्याउलट मंदिरात जाणे हा आमच्या रोजच्या दैनंदिनीचा भाग आहे. आमच्या पक्षाचे नेते नेहमी मंदिरात जातात पण धर्म ही गोष्ट आम्ही कधीच रस्त्यावर आणत नाही.

दुसरीकडे भाजपकडून नेहमीच वेगवेगऴ्या खेळ्या करून चलाखीने हिंदुत्वाचा वापर केला जातो. प्रत्येक निवडणुकीच्या आधी काहीतरी धार्मिक मुद्दे भाजप परिवारातील संघटना पुढे करतात आणि त्यावरून राजकारण तापवले जाते.

ज्याच्या फायदा शेवटी भाजपला होतो. एकूणच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पेट्रोल दरवाढ, महागाई हे जनतेच्या जगण्याचे प्रश्न मागे पडून अस्तित्वात नसलेल्या धार्मिक मुद्यांवर ही निवडणूक सर्वच राजकीय पक्ष घेऊन जातील अशी चिन्हे आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.