नवी दिल्ली, दि.20 – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शनिवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 51 पैशांची, तर डिझेलच्या दरात 61 पैशांची वाढ केली. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरांत सलग 14 व्या दिवशी वाढ झाली. दरवाढीच्या त्या सत्रामुळे डिझेलच्या किमतीने आजवरचा उच्चांक गाठला आहे.
ताज्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 78 रुपये 88 पैसे इतका झाला. तर डिझेलची किंमत 77 रुपये 67 पैसे झाली. डिझेलचा नवा दर देशाच्या राजधानीतील आजवरचा सर्वोच्च ठरला आहे. याआधी दिल्लीत 16 ऑक्टोबर 2018 या दिवशी नोंदला गेलेला 75 रुपये 69 पैसे हा दर सर्वांधिक ठरला होता. दिल्लीत पेट्रोलचा सर्वोच्च दर (84 रुपये) 4 ऑक्टोबर 2018 या दिवशी नोंदला गेला.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज बदल करण्याची प्रक्रिया 82 दिवस स्थगित होती. ती प्रक्रिया सार्वजनिक कंपन्यांनी 7 जूनपासून पुन्हा सुरू केली. तेव्हापासून सलग दोन आठवडे दरवाढीचे सत्र चालू आहे. सलग 14 दरवाढींमध्ये मिळून पेट्रोल 7 रुपये 62 पैशांनी, तर डिझेल 8 रुपये 28 पैशांनी महागले आहे. दोन्ही इंधनांची दरवाढ संपूर्ण देशासाठी लागू आहे. मात्र, प्रत्येक राज्यात त्या इंधनांवर स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) वेगवेगळा दर आकारला जातो. त्यामुळे राज्याराज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भिन्न आहेत.