दोन दिवसांत माणगंगेत उरमोडीचे पाणी सोडणार ः जानकर

जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात बांधणार ः सिन्हा
माण तालुक्‍यातही 18 ठिकाणी चारा छावण्या सुरू केल्या असल्या तरी शेतकरी त्याठिकाणी जावयास तयार नाही. आम्हाला शासनाचा चारा नको; पण किमान पाणी द्यावे. यासाठी खास बाब म्हणून टंचाईतून उरमोडीचे पाणी म्हसवडच्या माणगंगा नदीपात्रात सोडावे, यासाठी मंत्रीमहोदयांनी प्रयत्न करावेत. अन्यथा छावणीतील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन जनावरांचा मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सुरू केला जाईल, असा इशारा छावणी चालक विजय सिन्हा यांनी मंत्रीमहोदयांसमोरच दिला. त्याला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून प्रतिसाद दिला.

म्हसवड – माण तालुक्‍यात सध्या भीषण दुष्काळ पडलेला असून याचा शेती व पाण्यावर गंभीर परिणाम झाला आहे, त्यामुळे माण तालुक्‍यातील शेतकऱ्यांसमोर जनावरे जगवण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हे पशुधन जगवण्यासाठी आमच्या सरकारने माण तालुक्‍यात ठिकठिकाणी जनावरांच्या चारा छावण्या सुरू केल्या आहेत. पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी टॅंकर उपलब्ध करुन दिले आहेत मात्र ते पुरेसे नसल्यानेच उरमोडीचे पाणी म्हसवडच्या माणगंगा नदीपात्रात दोन दिवसांत सोडून दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवू, असे प्रतिपादन दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.

म्हसवड येथे माणदेशीच्या वतीने सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. दिलीप येळगांवकर, माणदेशी फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा, विजय सिन्हा, बाळासाहेब मासाळ, मामुशेठ विरकर, अनिल देसाई, बबनदादा विरकर, आण्णासाहेब कोळी आदी प्रमुख उपस्थित होते. ना. जानकर म्हणाले, माण तालुक्‍याला वरदान ठरणाऱ्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आमच्या सरकारने भरघोस निधी दिला आहे. त्यामुळेच टेंभूसारख्या योजना मार्गी लागल्या आहेत.

यंदा भीषण दुष्काळ पडलेला आहे. चारा छावण्या काहीशा उशिरा सुरू झाल्या आहेत. मात्र म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनच्या वतीने सर्वात प्रथम यामध्ये पुढाकार घेत तालुक्‍यातील नव्हे तर राज्यातील पहिली जनावरांची चारा छावणी सुरू केली आहे. कोणतेही सरकारी अनुदान न घेता चारा छावणी सुरू आहे. या चारा छावणीला कोणतीही मदत लागल्यास तत्काळ देण्याचा प्रयत्न करूच. शिवाय चारा छावणी बंद होऊ देणार नाही. सरकारी छावणीला यापुढे 90 ऐवजी 106 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे त्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. दुधाला सर्वाधिक दर सरकारने दिलेला आहे. जर एखादी डेअरी तुमच्या दुधाला दर देत नसेल तर त्यांना प्रथम ऍप भरले आहे का? असा प्रतिप्रश्‍न विचारा. ज्या डेअरीने सरकारी ऍप भरले आहे त्या डेअरीला दुधाचा दर चांगला व सर्वाधिक आहे. यापुढे राज्यातील चारा छावणीला कसलाही चारा व पाणी कमी पडू देणार नसल्याचा पुनरुच्चार करीत पाण्यासाठी मी स्वत: लक्ष घालत असल्याचे शेवटी जानकर यांनी सांगितले. चेतना सिन्हा, डॉ. दिलीप येळगांवकर यांनी मनोगत व्यक्‍त
केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.