वॉशिंग्टन- अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन तेथे रोजगाराची स्थिती सुधारल्याचा अहवाल आल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भलतेच जोषात आले असून त्यांनी आपल्या प्रशासनाने आर्थिक संकट आणि करोनावर मात केल्याचाही दावा केला आहे.
व्हाईट हाऊसमधून जारी केलेल्या निवेदनात त्यांनी अमेरिकेची स्थिती आता सर्वच बाजूंनी सुधारली असल्याचे म्हटले आहे. वास्तविक करोनामुळे तेथे मरण पावणाऱ्यांची संख्या अजूनही कमी झालेली नाही, तसेच एका कृष्णवर्णीय कैद्याच्या मृत्युमुळे संपूर्ण देशात झालेल्या निदर्शनांमुळे तेथे मोठ्या प्रमाणात सामाजिक अस्वस्थता पसरली आहे. तसेच रोजगारची स्थितीही अजून म्हणावी तशी सुधारलेली नसतानाच ट्रम्प यांनी मात्र अमेरिकेच्या सर्वंकष स्थितीत सुधारणा झाल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेतील रोजगाराच्या स्थितीत सुधारणा झाल्याचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे त्या आधारावर त्यांनी विरोधकांवर मात करण्याचा प्रयत्न चालवला आहे. वाढती बेरोजगारी आणि बिकट आर्थिक स्थितीमुळे विरोधकांनी त्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. तेथील अध्यक्षीय निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे हवालदिल झालेल्या ट्रम्प यांना या अहवालामुळे मोठाच जोष चढला आहे. फ्लाईड याच्या मृत्यनंतर उद्भवलेल्या स्थितीवर त्यांनी प्रथमच जाहीर भाष्य करताना त्याच्या मृत्यूचा निषेध केला आहे.