सापाचे नाव ऐकताच जवळपास सर्वांचाच थरकाप उडतो. साप हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, ज्याच्या चाव्यामुळे माणसांचा मृत्यू होऊ शकतो. यामुळेच लोकांना सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. तसं तर हे अगदी बरोबर आहे. कारण सापाजवळ राहणे आपल्याला नुकसानच पोहोचवते.
सापांपासून आपल्याला फारसा फायदा होत नाही. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात एक अशीही जागा आहे जिथे सापांची शेती केली जाते. होय, हे विचित्र वाटेल, परंतु हे खरे आहे की चीनच्या झेजियांग प्रांतातील एका गावात लोक सापांना घरात ठेवतात. एवढेच नाही तर या सापांमुळेच हे लोक घर चालवतात. सामान्यतः लोक उपजीविकेसाठी अनेक प्रकारची कामे करतात, परंतु ही पद्धत अतिशय अनोखी आहे, तसेच धोकादायक आहे.
आपण जगभरातील लोकांना आपले घर चालविण्यासाठी सर्व प्रकारची कामे करताना पाहिले असेल, परंतु सापांची शेती खरोखरच आश्चर्यकारक आहे. हे भलतच धाडस चीनच्या झेजियांग प्रांतातील एका गावात केले आहे.
या गावात लोक विषारी साप पाळतात. चीनमधील या गावाचे नाव जिक्सिकियाओ आहे, जिथे मत्स्यपालनासारखेच सर्पपालन (स्नेक फार्मिंग) केले जाते. येथे दरवर्षी सुमारे 30 लाख सापांचे पालनपोषण केले जाते. या गावात राहणाऱ्या लोकांनी या सापांना आपले उत्पन्नाचे मुख्य साधन बनवले आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चीनमध्ये सर्प पालनाची परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे. या गावात 1980 मध्ये पहिल्यांदा सापांची शेती करण्यात आली होती, असे सांगितले जाते. याचाच अर्थ गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील लोक शेतात पिकं घेण्याऐवजी साप पाळण्याचे काम करत आहेत.
वास्तविक, चिनी औषधांमध्ये विषारी सापांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे हे साप खूप उपयोगी पडतात. एक हजाराहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या या गावात 100 हून अधिक स्नेक फार्म आहेत. यावरून सापांच्या व्यापाराचा अंदाज बांधता येतो.
त्वचेचे आजार बरे करण्यापासून ते कॅन्सरच्या औषधांपर्यंत सर्व गोष्टींसाठी या सापांचा उपयोग होतो. कोब्रा, वायपर, अजगर, रॅटल यांसारख्या विषारी सापांपासून ते विष नसलेल्या सापांचीही येथे लागवड केली जाते. यासोबतच उन्हाळ्यात सापांची पिल्ले पाळली जातात आणि हिवाळ्यात अमेरिका, दक्षिण कोरिया, रशिया, जर्मनीसह जगातील अनेक देशांमध्ये या सापांची विक्री केली जाते.