अकोला – रामायणातील संदर्भानुसार दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता. तेंव्हापासून दसऱ्याला म्हणजे विजयादशमीला रावणाला (वाईट प्रवृत्ती) जाळण्याची प्रथा आहे. मात्र अकोला येथील पातूर तालुक्यातील सांगोळा गावात रावणाची पूजा केली जाते. रावण हा शंकराचा मोठा भक्त होता. त्याच्याकडे अनेक चांगले गुण होते. त्या गुणांची येथे पूजा केली जाते.
या गावात रावण पूजनाची 200 वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. येथे दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हाथ, काळ्या पाषाणातील दशमुखी, वीस भुजाधारी चार फूट उंचीची रावणाची मूर्ती आहे.
दरम्यान, रावणाला दुष्ट समजून विजयादशमीला त्याचे दहन केले जाते. मात्र अनेक संदर्भातून तसेच रामायणामध्येही रावणाच्या गुणांचे वर्णन केले आहे. सीतेचे हरण केले म्हणून रावणाला वाईट समजले जाते, मात्र तो महान तपस्वी, शंकराचा भक्त होता, महाज्ञानी होता, अनेक चागले गुण रावणामध्ये असल्याने त्याच्या चांगल्या गुणांची येथे पूजा केली जाते.