रांची – झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेल 25 रुपये स्वस्त मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही घोषणा केली आहे. मात्र या स्वस्त पेट्रोल आणि डिझेलचा लाभ फक्त बीपीएल कार्डधारकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील बीपीएल कार्डधारकांना पेट्रोल आणि डिझेल 25 रुपये स्वस्त मिळेल असं सांगितले आहे.
झारखंडमधील पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन वारंवार पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी करत होते. असोशिएशन सरकारला पेट्रोलवरील पाच टक्के व्हॅट कमी करण्याची मागणी करत होते. सरकारने जर व्हॅट कमी करुन 22 टक्क्यांवरुन 17 टक्के केला तर लोकांना मोठा दिलासा मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे.
झारखंडची शेजारी राज्य उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशामध्ये डिझेलच्या किंमती कमी असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे. त्यामुळे झारखंडमध्ये चालणारी वाहने शेजारी राज्यांमध्ये जाऊन डिझेल भरत आहेत. याचा मोठा तोटा त्यांना सहन करावा लागत होता.
असोशिएनचे अध्यक्ष अशोक सिंह यांनी सांगितले आहे की, पेट्रोलियम डिलर्सनी हेमंत सोरेन यांना चिठ्ठी लिहिली होती आणि अर्थमंत्र्यांची भेटही घेतली होती. झारखंडमध्ये 1350 पेट्रोल पंप आहेत, ज्यांच्यावर अडीच लाख कुटुंब अवलंबून आहेत. व्हॅट जास्त असल्याने व्यवसायांनाही मोठा फटका बसत आहे.
वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत होती. यानंतर दिवाळीला केंद्र सरकारने लोकांना दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या अबकारी करता पाच आणि दहा रुपयांची घट केली होती. केंद्र सरकारने पेट्रोलवर प्रति लिटर पाच आणि डिझेलवर प्रति लिटर दहा रुपये अबकारी कर कमी केला होता. यानंतर देशभरातील इंधनदरात घट झाल्याचे पहायला मिळाले होते.
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर देशातील भाजपा आणि मित्रपक्षांचे सरकार असलेल्या तब्बल 17 राज्यांनी आपला व्हॅट कमी केला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, मध्य प्रदेश, हिमालच प्रदेश यांच्यासोबत सर्व राज्यांनी व्हॅट कमी केली होता. कॉंग्रेसशासित काही राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला होता.