हैदराबाद – भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला जागतिक सिरीज स्पर्धेतही सलामीलाच पराभवाचा धक्का बसला. वर्ल्ड टूर फायनल्सच्या या स्पर्धेत सिंधूला पहिल्याच फेरीत तई त्झू यिंगकडून 21-19, 12-21, 17-21 असाकेवळ 59 मिनिटांत पराभव पत्करावा लागला.
सिंधू व किदांबी श्रीकांत यांना या स्पर्धेसाठी खडतर ड्रॉ मिळाला होता. श्रीकांत या स्पर्धेसाठी पात्र ठरणार हे अपेक्षित होते. पण, सिंधू अनेक मानांकित खेळाडूंच्या माघारीमुळे केवळ नशिबाच्या जोरावर या स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. अगदी अखेरच्या क्षणी तिला या स्पर्धेत स्थान मिळाले होते तरीही तीला काहीही प्रभाव पाडता आला नाही.
जागितक अव्वल मानांकित तई त्झु यिंग हिच्यासह माजी जगज्जेती रॅटचनॉक इन्टॅनॉन आणि पॉर्नपवी चोचुवॉंग यांच्यासह तिचा ब गटात समावेश करण्यात आला होता. करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर सिंधूचे कोर्टवरील पुनरागमन फारसे यशस्वी नाही. डेन्मार्क स्पर्धेतून तिने माघार घेतली. थायलंड ओपन स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत पहिल्याच फेरीत तिचे आव्हान आटोपले.
दुसऱ्या टप्प्यात उपांत्यपूर्व फेरीत ती रॅटचनॉक हिच्याकडूनच पराभूत झाली. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी तीन महिने इंग्लंडला राहिल्यानंतर खरे तर सिंधूकडून खूप अपेक्षा बाळगल्या जात होत्या. पण, प्रत्यक्षात तिची कोर्टवरील कामगिरी अत्यंत सुमार झाली.