पुन्हा ४ जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू; तालुक्यात एकूण १८ बाधित
वेल्हे (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यातील वडगांव झांजे करोनाच्या विळख्यात सापडले असल्याचे धक्कादायक अहवाल समोर आला आहे. पुणे पासून नजिक असणारा वेल्हे तालुका दुर्गम भागात मोडतो. तालुक्यात रोजगार नसल्याने बहूतंशी मंडळी कामानिमित्त पुण्याला गेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात या मंडळींनी काही दिवस पुण्यात राहण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तसा या मंडळींनी गाव गाठला. त्यामुळे वेल्हे तालुका सुरूवातीपासून करोनाच्या विळख्यात सापडत गेला.
तालुक्यातील वडगाव झांजे परिसरात करोनाने कहरच केला आहे. पहिल्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ३० जणांचा कोरोना तपासणी अहवाल सोमवारी (दि.१८) वेल्हे प्रशासनाकडे प्राप्त झाला होता. त्या तीसपैकी ४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचबरोबर पुणे येथे उपचार घेत असलेल्या एकाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मृत व्यक्ती वेल्हे तालुक्यातील वडगाव झांजे परिसरातील रहिवासी असली तरी पुणे मनपा हद्दीतील पत्ता सांगितल्याने त्याचा समावेश पुणे शहरातील रुग्णांमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे सद्यस्थितीत पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या वेल्हे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल १८ वर पोहोचली असल्याची माहिती वेल्हे प्रशासनाकडून मिळाली आहे.या अहवाला नंतर पुन्हा प्रशासनाची कसरत पाहायला मिळाली.
वडगाव झांजे केंद्रस्थानी मानून परिसरातील सुरवड, सोंडे सर्फाला, सोंडे माथना, मंजाई असनी असे तीन किलोमीटर परिसरातील गावे बफर म्हणून घोषित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाची तपासणी करत आहेत. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. या परिसरातील गावांमध्ये प्रशासनाकडून नियमित औषध फवारणी करून प्रतिबंधात्मक उपाय युद्धपातळीवर केला जात आहे.
सध्या वडगाव झांजे परिसरात करोनाने धुमाकूळ घातलेला असतानाही परिसरातील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. अजूनही परिसरातील नागरिक हातावर क्वारंटाईनचे शिक्के असताना इतरांच्या संपर्कात जाऊन भेटीगाठी गप्पागोष्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर पहिल्या आरोग्य सर्वेक्षणानुसार गावातील लोकसंख्या ४१२ इतकी होती. तर बाहेरून गावात येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता गावातील एकूण संख्या ५६८ वर पोहोचलेली आहे. करोनाच्या विळख्यात सापडलेल्या वडगांव झांजेला बाहेर काढण्यासाठी वेल्हे प्रशासनासमोर मोठे आव्हान येवून ठेपले आहे.