वॉशिंग्टन- अमेरिकेने 18 वर्षांवरील प्रत्येकाला करोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली. 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला 19 एप्रिलपासून लस घेता येईल, असे बायडेन यांनी सांगितले.
बायडेन यांनी यावेळी आम्ही 150 दशलक्ष डोस देण्याचा आकडा ओलांडला असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्राध्यक्ष म्हणून 100 दिवस पूर्ण होईपर्यंत 200 दशलक्ष डोसचा आकडा पार करु अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबतच 150 दशलक्ष डोस देण्याचा आकडा गाठणारा आणि 62 दशलक्ष लोकांचे पूर्णपणे लसीकरण करणारा अमेरिका पहिला देश असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी लसीकरण केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दुसरीकडे, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतातही लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. 18 वर्षांपुढील सर्वच नागरिकांना करोनाची लस खुली करा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) केली आहे. यासंदर्भात असोसिएशनने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.