काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या ‘या’ दोन मतदारसंघांमध्येच पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

उत्तर प्रदेश – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताचा कौल दिला. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमधील यशापेक्षाही मोठे यश पंतप्रधान मोदींच्या झोळीत टाकत मतदार राजाने मोदींच्या कारभाराबाबत आपण समाधानी असल्याचेच दर्शवले. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुका ज्या प्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या अभूतपूर्व विजयाने अचंबित करणाऱ्या ठरल्या त्याच प्रमाणे त्या भारतीय राजकारणातील सर्वाधिक जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या पडझडीने देखील तितक्याच महत्वाच्या ठरल्या.

१७व्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांमधील काँग्रेससाठीचा सर्वाधिक धक्कादायक निकाल भारतामध्ये लोकसभा जागांच्या बाबतीत सर्वाधिक मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात लागला आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून गेल्या अनेक दशकांपासून गांधी घराण्यातील उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरत असून अमेठीतील जनतेनेही दर वेळी गांधी घराण्यातील उमेदवारालाच कौल दिला आहे. मात्र यंदा हा गड काँग्रेसच्या हातातून निसटला असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा पराभव करत स्मृती इराणींनी पहिल्यांदाच इथं ‘कमळ’ फुलवलं आहे. अमेठीतून काँग्रेस अध्यक्षांचा पराभव ज्या प्रमाणे काँग्रेससाठी मानहानीकारक आहे त्याच प्रमाणे उत्तर प्रदेशातील अनेक निकाल देखील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाचीच आकडेवारी अधोरेखित करीत आहेत.

काँग्रेसचे पतन झालेल्या अशाच मतदारसंघांपैकी अलाहाबाद आणि फुलपुर हे दोन लोकसभा मतदारसंघ असून एकेकाळी हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे गड मानले जात असत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये मात्र या दोन्ही मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले असून त्यांना मिळालेली मतं अत्यल्प आहेत. यंदा काँग्रेसने निवडणुका अगदी तोंडावर असताना भाजपमधून पक्षात आलेल्या योगेश शुक्ला यांना अलाहाबादमधून तर अपना दलाचे अध्यक्ष कृष्णा पटेल यांचे जावई असणाऱ्या पंकज निरंजन यांना फुलपुरमधून उमेदवारी दिली होती.

नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या या दोन्ही उमेदवारांना जनतेने साफ नाकारल्याचं चित्र दिसलं. अलाहाबादमधून योगेश शुक्ला यांना एकूण मतदानाच्या ३.५९% तर फुलपुरमधून पंकज निरंजन यांना ३.३५% एवढं मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकांमध्ये उभा राहिलेल्या उमेदवाराला जर एकूण मतदानाच्या १/६ (१६.५७%) मतदान झाले तरच त्याने डिपॉझिट म्हणून भरलेले २५,००० रुपये त्याला परत केले जातात. मात्र अलाहाबाद आणि फुलपुर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार ही आकडेवारी गाठू न शकल्याने त्यांच्यावर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.