लोणावळा (वार्ताहर) – पुणे, मुंबईसारख्या महानगरात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघून त्याठिकाणी चाकरमानी म्हणून राहिलेल्या नागरिकांसोबतच लोणावळा शहरात “सेकंड होम’ असलेल्या धनिकांचे लोंढे सध्या लोणावळ्याकडे लोटले आहे. त्यामुळे साहजिकच स्थानिक प्रशासनावरील ताण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. सुदैवाने आतापर्यंत शहरात एकही करोना रुग्ण आढळला नसला तरी असा बाधित रुग्ण केव्हाही सापडण्याची शक्यता असल्याने लोणावळा नगरपरिषद प्रशासन सतर्क राहिले आहे.
करोनाच्या महामारीमध्ये अद्याप तरी पर्यटननगरी लोणावळा शहराकडे एक सुरक्षित ठिकाणी म्हणून पाहिले जात आहे. मात्र यामुळेच पुणे, मुंबईकडील ज्या-ज्या धनिकांचे बंगले, फ्लॅट लोणावळा शहरात आहेत, त्यांची पावले आता लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. आणि हीच खऱ्या अर्थाने लोणावळा शहरासाठी धोक्याची घंटा ठरू पहात आहे. एकीकडे या अशा नागरिकांना रोखणे अवघड जात असले तरीही, स्थानिक नगरपरिषद प्रशासन पोलिसांच्या मदतीने यावर प्रभावी उपाययोजना करीत आहे. किमान अजूनपर्यंत तरी करोनाला शहराच्या सीमेबाहेर ठेवण्यात प्रशासन आणि नागरिक नक्कीच यशस्वी ठरले आहे.
लोणावळा शहराचे एकूण क्षेत्रफळ 38 चौरस किलोमीटर असून, येथील लोकसंख्या 60 हजारांहून अधिक आहे. सोबतच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातून बाजारहाट तसेच वैद्यकीय आणि अन्य महत्त्वाच्या कामासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या खूपच मोठी आहे. या कारणास्तव लोणावळा शहरात शिरणाऱ्या मार्गावर खंडाळा आणि वलवण या दोन्ही ठिकाणी पोलीस आणि नगरपरिषद कर्मचारी यांचे संयुक्त “चेकपोस्ट’ उभारण्यात आले आहे.
आता बाहेरून येणाऱ्या अधिकाधिक नागरिकांची आणि वाहनांची याठिकाणी तपासणी केली जात आहे. अपवादात्मक परिस्थितीत यातूनही सुटून काही लोक शहरात पोहोचत आहे. त्यामुळे त्यांना शोधून काढून क्वारंटाइन करणे, तसेच विनापरवाना असेल तर कारवाई करणे हा देखील स्थानिक प्रशासनासाठी एक मोठा “टास्क’ ठरत आहे.
लोणावळा शहरात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत, पोलीस निरीक्षक मनोज यादव, संदीप घोरपडे, उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरात वेगवेगळ्या स्तरावर प्रशासनाचे काम सुरू आहे.
आतापर्यंत 1 हजार 169 नागरिक ‘क्वारंटाइन’
28 मार्चपासून गुरुवारी (दि. 21) सकाळपर्यंत परगावाहून लोणावळा शहरात आलेल्या 1 हजार 169 नागरिकांना नगरपरिषदेने क्वारंटाइन केले आहे. यातील साधारणपणे 130 जणांना संस्थात्मक क्वारंटाइन, तर उर्वरित 1 हजार 39 जणांना “होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. यातील अनेक जणांचा क्वारंटाइन पिरीयड हा संपला असून, गुरुवारी सकाळपर्यंत शहरात 443 जण “ऍक्टिव्ह क्वारंटाइन पिरीयड’मध्ये आहेत. यात 397 होम क्वारंटाइन, तर 46 जण संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलेले आहेत. याशिवाय आतापर्यंत विनापरवाना लोणावळा शहरात दाखल झालेल्या एकूण 51 जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत नगरपरिषद हद्दीतील एकूण 9 जणांचे स्वॅब अर्थात नमुने संशयित म्हणून तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले होते. मात्र, हे सर्व नमुने “निगेटिव्ह’ आल्याने लोणावळेकर आतापर्यंत तरी सुदैवी ठरले आहेत.
आरोग्य तपासणीसाठी पाच वेगवेगळे वैद्यकीय पथक
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने शहरात एकूण 4 संस्थात्मक क्वारंटाइन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांची एकूण 200 लोकांची क्षमता आहे. सोबतच 100 खाटांची क्षमता असलेले एक करोना केअर सेंटर नगरपरिषदेने राज्य सरकारकडे प्रस्तावित केले आहे. याशिवाय लोणावळेकर नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी नगरपरिषदेने 5 डॉक्टर, 12 नर्स, 23 आशासेविका, 26 अंगणवाडीसेविका आणि 30 नगरपरिषद कर्मचारी अशा पाच वेगवेगळ्या गटामध्ये नेमली गेली आहे. हे सर्वजण घरोघरी जाऊन, नागरिकांचे शारीरिक तापमान, त्यांच्या रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण, हृदयाचे ठोके आदी तपासत आहेत. त्यांच्या मागील काही दिवसातील गाठीभेटी, प्रवास असा पूर्व इतिहास जाणून घेत आहेत. आतापर्यंत अशा एकूण 4 फेऱ्या पूर्ण झाल्या असून पाचवी फेरी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.