महामंडळासाठी बस ठरतेय डोकेदुखी : अपघातांसह वातानुकूलित यंत्रणा बंद पडण्याच्या घटनांत वाढ
पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही बस अनेक समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. अनेकदा वातानुकूलित यंत्रणा (एससी) बंद पडत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. यासारखे प्रकार प्रामुख्याने भाडेतत्त्वावरील शिवशाही बसमध्ये घडत असल्याची, माहिती समोर येत आहे.
एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत प्रवाशांच्या सेवेसाठी शिवशाही बस सुरू केली; परंतु मागील काही महिन्यांपासून शिवशाही बसमुळे प्रवाशांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या बसचे वाढते अपघात, प्रवाशांना मिळणारी असुरक्षित सेवा, बस ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण व इतर बाबींमुळे प्रवाशांनी शिवशाही बसने प्रवास करण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. त्यामुळे, प्रवाशांची संख्या कमी झाल्याने महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. गेल्या महिन्यात स्वारगेट-सांगली विनावाहक शिवशाही बसमधील वातानुकूलित यंत्रणा अचानक बंद पडल्याने कात्रज चौकात बस थांबवून पर्यायी बस उपलब्ध करून देण्यात आली. यासारखे प्रकार सतत घडत असल्याने प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
तातडीने पर्यायी बस उपलब्ध करून देणे बंधनकारक
राज्यभरात कुठेही वातानुकूलित बसने प्रवास करत असताना अचानक वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यास तातडीने दुसरी बस उपलब्ध करून देणे बंधनकारक असते. मात्र, बहुतांशवेळा रात्रीच्या सुमारास एससी बंद पडल्यास प्रवाशांना पर्यायी बस उपलब्ध होत नाही. याचबरोबर, या बसच्या खिडक्याही उघडता येत नसल्याने वातानुकूलित बसचे तिकीट काढूनही अचडणींना तोंड देत प्रवास पूर्ण करावा लागतो.