मेलबर्न – ॲशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डावही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर 4 बाद 31 असा गडगडला आहे. जर ही कसोटी गमावली तर त्यांना ऍशेस मालिकाही गमवावी लागणार आहे.
इंग्लंडचा पहिला डाव 185 धावांवर संपूष्टात आणत ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 267 धावा करत 82 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडला या सामन्यात दुसऱ्या डावातही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यांचे 4 फलंदाज तंबूत परतले असून कर्णधार ज्यो रूट 12 तर, अष्टपैलु बेन स्टोक्स 2 धावांवर खेळत आहेत. सोमवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंड अद्याप 51 धावांनी पिछाडीवर असून ऑस्ट्रेलियाला मोठ्या विजयाची संधी आहे.
1 बाद 61 धावांवरून पुढे खेळ सुरु झाल्यावर इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने त्यांच्यावर दडपण राखले. या डावात मोठी धावसंख्या उभारून दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची गरज पडू नये या ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षांना मात्र, सुरुंग लागला. त्यामुळे त्यांना केवळ 82 धावांची निसटती आघाडी मिळवता आली. मात्र, या अनुकुल स्थितीचाही लाभ इंग्लडला घेता आला नाही.
मिशेल स्टार्क व नवोदित स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीची पुन्हा एकदा वाताहत केली. स्टार्कने जॅक क्राऊली आणि डेव्हिड मलानला पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत इंग्लंडची अवस्था 2 बाद 7 धावा अशी केली. त्यानंतर बोलंडने 11 व्या षटकात हासीब हमीद आणि जॅक लीच यांना बाद करत त्यांच्यासमोर डावाच्या पराभवाचे संकट उभे केले.
यावेळी त्यांची स्थिती 4 बाद 22 अशी बिकट केली होती. त्यानंतर रूटने स्टोक्सला साथीला घेत संघाचे दिवसअखेर आणखी नुकसान होऊ दिले नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क आणि बोलॅंडने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
करोनाची एन्ट्री
ॲशेस कसोटी मालिकेत इंग्लंड संघाच्या सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य आणि दोन खेळाडूंच्या कुटुंबातील दोन व्यक्ती अशा एकूण चार जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या चारही व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत मात्र, हे उघड झाल्यावर दोन्ही संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच सामन्याशी संबंधित सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली असून त्याचा आहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, यानंतरही कोणाला बाधा झाल्याचे निष्पन्न झाले तर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
रूटच्या कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक धावा
इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने एकाच कॅलेंडर वर्षांत सर्वाधित कसोटी धावा करण्याचा 13 वर्षे जुना विक्रम मोडला व ही कामगिरी आपल्या नावावर जमा केली. यंदाच्या वर्षांत रूटने 15 कसोटी खेळताना 1680 धावा केल्या आहेत. त्यात एका द्विशतकासह एकूण सहा शतके व 4 अर्धशतकांचा समावेश आहे. या पूर्वी एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार ग्रॅमी स्मिथ याच्या नावावर होती. त्याने 2008 साली 1657 धावा करत ही कामगिरी केली होती.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव – 185. ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 87.5 षटकांत सर्वबाद 267 धावा. (मार्कस हॅरीस 76, डेव्हीड वॉर्नर 38, ट्रॅव्हीस हेड 27, पॅट कमिन्स 21, मिशेल स्टार्क नाबाद 24, जेम्स अँडरसन 4-33, ओली रॉबिन्सन 2-64, मार्क वुड 2-71). इंग्लंड दुसरा डाव – 12 षटकांत 4 बाद 31 धावा. (ज्यो रूट खेळत आहे 12, बेन स्टोक्स खेळत आहे 2, स्कॉट बोलंड 2-1, मिशेल स्टार्क 2-11)