“स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’चे अभियान
तपशील पाठविण्याचे आवाहनविद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांतून राष्ट्रीय सेवा योजनेचे 300 स्वयंसेवक, शिक्षक व महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून 100 स्वयंसेवक असे एकूण 400 जण सलग 20 दिवस वारी मार्गावर अभियान राबविणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील 5 विद्यार्थी स्वयंसेवक व 5 विद्यार्थिनी स्वयंसेवक व संघनायक म्हणून 1 शिक्षक यांची नावे व मोबाइल नंबर याचा तपशील विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यालयाला मेलद्वारे गुरुवार (दि.13) पर्यंत पाठवावा, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्य, संचालक यांना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी 2 दिवस व 20 दिवसांसाठी वारीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी भीमाशंकर येथे होणाऱ्या कार्यशाळेत सादर करावी, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे 22 हजार विद्यार्थी पुणे ते पंढरपूर वारी मार्गावरील अभियानात सहभागी होणार आहेत. वारी मार्गावर स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी हे अभियान राबविण्यात येणार
आहे.
येत्या 22 जून ते 15 जुलै या कालावधीत महाविद्यालयांमधील विद्यार्थी पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालख्यांच्या वारी वार्गावर अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात वारीमार्गावरील संपूर्ण स्वच्छता, 50 लाख पानाच्या पत्रावळ्यांचे वाटप, 750 टन ओला कचरा व निर्माल्यांचे संकलन, 350 टन सेंद्रिय खतनिर्मिती, 35 लाख लिटर पाण्याची बचत, 2 लाख वारकऱ्यांची आरोग्य शिबिरातून सेवासुश्रुषा व साधनांचे वाटप, 2 लाख वारकरी व गावकऱ्यांचे प्रबोधन, 20 हजार कडुनिंब रोपांची वारीमार्गावर लागवड व संगोपन करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यक्रमही राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.