तहसील कार्यालयातच “घशाला कोरड’

देखभाल दुरुस्ती अभावी पाणपोई बंद ः नागरिकांसह कर्मचाऱ्यांचीही गैरसोय

वडगाव मावळ – मावळ तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी लायन्स क्‍लब ऑफ वडगाव यांच्या वतीने दोन वर्षांपूर्वी एक लाख रुपये खर्चून शुद्ध पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरु केली होती. ही पाणपोई देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली असून नागरिक व कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे.

मावळ तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात महसूल शाखा, निवडणूक शाखा, संजय गांधी निराधार शाखा, शिधापुरवठा शाखा, अभिलेख कक्ष, वनपरिक्षेत्र, नागरी सुविधा केंद्र, पोलीस स्टेशन आदी कार्यालय असल्याने दैनंदिन हजारो नागरिकांची वर्दळ असते. नागरिक व कर्मचाऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. त्यांना दूषित पाणी प्यावे लागत होते. तसेच पाण्याच्या बॉटल विकत घ्याव्या लागत होत्या.

नागरिक व कर्मचाऱ्यांची गैरसोय ओळखून लायन्स क्‍लब ऑफ वडगाव यांच्या वतीने दोन वर्षांपूर्वी लाख भर रुपये खर्चून पाणपोई उभारण्यात आली. तहसीलदार कार्यालयाकडून पाणपोई ची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती केली नसल्याने काही महिन्यांपासून पाणपोई बंद असल्याने नागरिक व कर्मचाऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे.

पाणपोईची दुरुस्ती करून त्वरित पाणपोई सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सोमा भेगडे, अतुल वायकर, दिनेश पगडे, महिंद्रा म्हाळसकर, नागरिक व कर्मचाऱ्यांनी केली. लायन्स क्‍लब ऑफ वडगाव अध्यक्ष सुनील कदम म्हणाले नागरिक व कर्मचाऱ्यांच्या शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने ही पाणपोई सुरू केली होती. तहसील कार्यालयाकडून पाणपोईची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती केली नसल्याने पाणपोई बंद आहे. नागरिक व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.