टेबल टेनिस स्पर्धेत पटेलची दुहेरी कामगिरी

पुणे – ठाण्याच्या दीपित पटेल याने कुमार मुले व पुरुष या दोन्ही गटांत विजेपेपद पटकाविले आणि राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी कामगिरी केली. स्पर्धेतील महिलांमध्ये सृष्टी हळंगडीने विजेतेपद घेतले तर कुमार मुलींमध्ये आदिती सिन्हा विजेती ठरली. सांगली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पटेलने पुरुषांच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगर संघाच्या रिगान अलबुकर्क याच्यावर रोमहर्षक विजय मिळविला. अटीतटीने झालेला हा सामना त्याने 5-11, 11-9, 6-11, 11-6, 10-12, 11-9, 11-9 असा जिंकला. कुमारांच्या अंतिम सामन्यात त्याने मुंबई उपनगर संघाच्या चिन्मय सोमया याचा 11-4, 15-13, 7-11, 15-13, 7-11, 5-11, 11-8 असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला. युवा मुलांच्या अंतिम लढतीत अलबुकर्क याने सोमया याचाच पराभव करीत अजिंक्‍यपदावर मोहोर नोंदविली. त्याने हा सामना 6-11, 11-8, 5-11, 11-6, 11-5, 11-9 असा जिंकला.

सबज्युनिअर मुलांच्या गटात मुंबई उपनगर संघाचा हाविश असरानी विजेता ठरला. त्याने अंतिम सामन्यात त्याचाच सहकारी आदिल आनंद याला 11-5, 11-5, 15-13, 11-5 असे सरळ चार गेम्समध्ये हरविले. मिडजेट गटात पुण्याचा शौरेन सोमण याला अजिंक्‍यपद मिळाले. त्याने अंतिम लढतीत ठाण्याच्या मयुरेश सावंत याला 8-11, 11-8, 10-12, 11-2, 11-1 असे पराभूत केले. कॅडेट गटात ठाण्याच्या हृदय देशपांडे याने विजेतेपदावर नाव कोरले. त्याने अंतिम सामन्यात प्रणय घोलकर याचा 12-10, 11-5, 8-11, 11-3, 11-5 असा पराभव केला.

महिलांमध्ये सृष्टीने अंतिम सामन्यात ठाण्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू ममता प्रभू हिला चकित केले. ही लढत तिने 16-14, 11-6, 11-13, 11-7, 11-9 अशी जिंकली. युवा मुलींच्या गटात मुंबई उपनगर संघाच्या विधी शहा हिने अव्वल क्रमांक मिळविला. तिने अंतिम लढतीत मंजुश्री पाटीलवर 9-11, 11-9, 11-8, 11-9, 3-11, 6-11, 11-8 अशी मात केली. कुमार मुलींमध्ये सिन्हाने अजिंक्‍यपद मिळविताना तेजल कांबळेवर 11-5, 11-5, 15-13, 11-5 असा विजय मिळविला. स्पर्धेतील अन्य गटात बी.रियानाकुमारी, पृथा वर्टीकर, जेनिफर व्हर्गीस यांनी अजिंक्‍यपद घेतले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)