ऐन उन्हाळ्यात मुक्‍या जिवांसाठी बळीराजाची दुनियादारी

बिदाल – कडक उन्हाळ्यात पक्ष्यांची पाण्यासाठी व भुकेसाठी धडपड पाहून दुष्काळी उत्तर माण तालुक्‍यातील येळेवाडी गावातील दडसवाडा वस्तीवरील बापूराव दडस या शेतकऱ्यांने उन्हाळ्यात कमी पाण्यावर ज्वारी, गहू, हरभरा या पिकाचे उत्पादन न घेता अर्ध्या एकरावर बाजरीचे पीक घेऊन पक्ष्यांना अन्नधान्याची व पाण्याची सोय केली आहे. झाडांवरही पाण्याने भरलेले भांडे ठेवली आहेत. या परिसरातील पक्षी बाजरीचे कणसं खाण्यासाठी शेतात दाखल होत आहेत. घरातील उरलेले अन्न सावलीत पक्ष्यांसाठी ठेवत आहेत.

दुष्काळी परिसरातील पाणवठे, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत पक्ष्यांना खाण्यासाठीही काही अन्नधान्य व पाणी मिळत नाही. पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्था होण्यासाठी बाजरीचे पीक राखले आहे. या परिसरातील पक्ष्यांच्या जगण्यासाठी अमूल्य ठरत आहे. दुष्काळामुळे पाणी आणि अन्नासाठी पक्ष्यांना मदत करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणी, अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करणे गरजचे आहे.
पाण्यासाठी सध्या पक्ष्यांची धडपड सुरू आहे. किमान गरजेपुरते पाणी मिळावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नातून पक्ष्यांनाही मदत होईल असे काम करणे गरजेचे आहे. आपल्या घराच्या अवतीभोवती, परिसरात पक्ष्यांसाठी छोटी घरटी तयार करणे किंवा त्यांना निवारा तयार करून देणे गरजेचे आहे.

चिमणी आणि बुलबुल यांच्याशिवाय अन्य पक्ष्यांचेही आवाज ऐकू येऊ लागलेत. दुष्काळी भागातून पक्षी आपल्याकडे येत आहेत. त्यांना अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध होतील या दृष्टीने ही मदत महत्त्वाची ठरेल. बाजरी पिकामुळे मोर, कबुतरे, चिमणी, कावळे, मैना, पोपट, चितुर, यांसारखे असंख्य पक्षी या ठिकाणी पाण्यासाठी येत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने या सर्व वन्यजिवांना पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे.

लोकांनी माणुसकी म्हणून घर, बाग, रस्ता ऑफिस, सार्वजनिक ठिकाणी, बागेत एखादी कुंडी, पाण्यासाठी एखादे पसरट भांडे ठेवले, तसेच उरलेले अन्न ठेवले तर आपल्या घराजवळ बगिच्याकडे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. यामध्ये पाण्याचे कुंड, पसरट भांडे उंचावर आणि थोडे सावलीत ठेवावे. त्याठिकाणीच अन्न, कण्या, धान्य न ठेवता ते बाजूला ठेवावे, जेणेकरून पाण्याच्या भांड्याला मुंग्या लागणार नाहीत.

संत गाडगेबाबांनी भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी द्यावे, हा माणुसकीचा संदेश दिला आहे. हाच माणुसकी धर्माचा विचार डोळ्यासमोर ठेवून पक्ष्यांसाठी अन्नाची व पाण्याची व्यवस्था केली.

बापूराव दडस, येळेवाडी

Leave A Reply

Your email address will not be published.