रोबोंच्या अंतराळात…

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेतर्फे यावर्षी व्योममित्र नावाचा ह्युमनॉइड अंतरिक्षात पाठविण्यात येणार आहे. हा मानवी रोबो मानवी शास्त्रज्ञाप्रमाणेच अंतरिक्षात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहे. मानवाला अंतरिक्षात पाठविण्याची तयारी इस्रो करीत आहे. त्याचा एक भाग म्हणून मानवापूर्वी चाचणी म्हणून प्राणी अंतराळात पाठविण्याऐवजी हा ह्युमनॉइड पाठविण्यात येणार आहे. अंतरिक्षातील सध्याची आव्हाने आणि भविष्यातील घटनाक्रम याविषयी माहिती देताना हा रोबो इस्रोने सादर केला.

मानवाला अंतरिक्षात पाठविण्याची योजना भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केली असून, गगनयान मोहीम त्यासाठी आखण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे मानवाला अंतरिक्षात पाठविण्यापूर्वी चाचणी म्हणून काही प्राण्यांना यानातून अंतरिक्षात पाठविण्याची पद्धत आहे. अमेरिका आणि रशियासारख्या प्रगत देशांनी मानवाला पाठविण्यापूर्वी हेच केले होते. त्यावेळी तंत्रज्ञान आजच्याइतके विकसित नव्हते. रोबोटिक्‍सच्या क्षेत्रात प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे प्राण्यांचा जीव धोक्‍यात घालण्यावाचून पर्याय नव्हता. आता मानवसदृश रोबो म्हणजेच ह्युमनॉइड्‌स उपलब्ध आहेत. सेन्सर, अन्य तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्व चाचण्या घेतल्या जाऊ शकतात. म्हणूनच गगनयानच्या माध्यमातून अंतराळवीरांना अंतरिक्षात पाठविण्यापूर्वी इस्रो अशा ह्युमनॉइडला यानातून पाठविणार आहे. व्योममित्र हे या ह्युमनॉइडचे नाव असून, अंतरिक्षातील सध्याची आव्हाने आणि भविष्यातील घटनाक्रम याविषयी माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी हा ह्युमनॉइड सादर केला.

ह्युमनॉइड आपल्या आसपासच्या वातावरणाचा वेध सेन्सरच्या माध्यमातून घेतात. कॅमेरा, स्पीकर, मायक्रोफोन अशी उपकरणे सेन्सरच्या साह्यानेच नियंत्रित केली जातात. त्याच्या मदतीनेच हे ह्युमनॉइड ऐकण्याचे, पाहण्याचे आणि बोलण्याचे काम करतात. सिवन यांनी सांगितले की, गगनयान मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या चार वैमानिकांना या महिन्याच्या अखेरीस रशियाला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल. रशियाच्याच मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा हे 1984 मध्ये अंतराळात गेले होते. आता भारतीय अंतराळवीर भारतीय मोहिमेद्वारे अंतरिक्षात झेपावतील. सोबत चांद्रयान-3 मोहिमेचे कामही जोमात सुरू असल्याचे सिवन यांनी नमूद केले. व्योममित्र हा ह्युमनॉइड माणसासारखा चालू-फिरू शकतो. तो एका शास्त्रज्ञाप्रमाणे काम करेल. महिलेच्या रूपात हा ह्युमनॉइड असून, ती अंतराळवीरांना त्यांच्या मोहिमेत सोबत करणार आहे. अंतराळवीरांना ती केवळ ओळखणारच नाही, तर त्यांनी सांगितलेली कामेही पूर्ण करेल. त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देईल. अंतरिक्षातील जीवनप्रणालीच्या संचालनावर नजर ठेवेल. सर्व प्रणाली योग्य प्रकारे सुरू आहेत की नाहीत, यावर तिची देखरेख असेल.

अंतरिक्षात जाणारी व्योममित्र ही पहिली रोबो नाही. यापूर्वीही अमेरिका, जपान आणि रशियाने अंतरिक्षात रोबो पाठविले होते. 2011 मध्ये नासा या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेने रोबोनॉट-2 हा यंत्रमानव अंतराळात पाठविला होता. 2013 मध्ये जपानने किरोबो नावाचा छोटासा यंत्रमानव आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविला होता. 2019 मध्ये रशियाने फोडोर नावाचा यंत्रमानव अंतराळ स्थानकावर पाठविला होता. ह्युमनॉइड म्हणजे माणसासारखा दिसणारा, चालणारा, आणि माणसासारखाच बोलणारा यंत्रमानव होय. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या प्रोग्रामिंगच्या साह्याने हा ह्युमनॉइड प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकतो. ऍक्‍च्युएटर्स आणि सेन्सर्स हे ह्युमनॉइडचे दोन प्रमुख अवयव आहेत. या दोन अवयवांवरच ह्युमनॉइडची संपूर्ण संरचना अवलंबून असते. माणसाप्रमाणे प्रतिक्रिया देण्यास आणि चालण्या-वागण्यास हेच दोन अवयव मदत करतात.

जगात तीन ह्युमनॉइड खूप प्रसिद्ध आहेत. सोफिया, कोडोमोरॉइड आणि जिया जिया अशी त्यांची नावे आहेत. या ह्युमनॉइड्‌सचा वापर सुरुवातीला संशोधन कार्यासाठी केला जात असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून माणसाचा मदतनीस म्हणून या ह्युमनॉइड्‌सचा वापर केला जात आहे. सर्वाधिक प्रसिद्ध असलेली ह्युमनॉइड म्हणजे सोफिया. हा जगातील पहिला यंत्र मानव होय. सोफियाला सौदी अरेबियाने नागरिकत्व बहाल केले आहे. 11 ऑक्‍टोबर 2017 रोजी संयुक्त राष्ट्रांमध्ये हा ह्युमनॉइड प्रदर्शित करण्यात आला होता. 2019 मध्ये सोफिया भारतातही आली होती. कोडोमोरॉइड हा जपानी ह्युमनॉइड आहे. टीव्हीवर निवेदक म्हणून हा ह्युमनॉइड काम करतो. कोडोमो या जपानी शब्दाचा अर्थ लहान मूल असा असून, गुगलच्या अँड्रॉइड या शब्दाशी मिलाफ करून कोडोमोरॉइड असा शब्द तयार करण्यात आला आहे. जिया जिया हा ह्युमनॉइड चीनने बनविला आहे. जगासमोर त्याला आणण्यापूर्वी चीनच्या सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी युनिव्हर्सिटीत तीन वर्षे त्याचे परीक्षण सुरू होते. हा ह्युमनॉइड संभाषणकलेत वाकब्‌गार आहे.

अंतरिक्षात सोडलेले उपग्रह जर नादुरुस्त झाले, तर ते दुरुस्त करण्यासाठी ह्युमनॉइड अंतराळात पाठविल्यास ते दुरुस्ती करून परत येऊ शकतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. इस्रोकडून अंतराळात पाठविण्यात येणारी व्योममित्र ही ह्युमनॉइड शरीराचे तापमान आणि हृदयाची गती तपासू शकते. भारताच्या अंतराळवीरांची निवड झाल्यानंतर आता प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू होईल. हे प्रशिक्षण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिले जाईल. पहिल्या टप्प्यासाठी दहा ते पंधरा अंतराळवीरांची निवड केली जाईल. प्रत्येक टप्प्यात उत्तीर्ण होणारे अंतराळवीर पुढील टप्प्याच्या प्रशिक्षणात प्रवेश करतील. रशियासह अन्य देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांचीही प्रशिक्षणासाठी मदत घेतली जाईल. कारण या क्षेत्रातील अनुभव इस्रोकडे नाही. आपण प्रथमच मानवाला अंतरिक्षात पाठविण्याची तयारी करीत आहोत. जीएसएलव्ही मॅक-3 या अंतरिक्ष यानाला मानवी मोहिमेसाठी अनुकूल बनविण्याचे कामही याच वर्षी सुरू केले जाईल. क्रू मोड्यूल आणि सर्व्हिस मोड्यूल अशा भागांमध्ये त्याची रचना केली जाईल. क्रू मोड्यूलमध्ये अंतराळवीर राहतील तर सर्व्हिस मोड्यूलमध्ये त्यांना आवश्‍यक असणारी उपकरणे असतील. ऑर्बिटल मोड्यूल सात दिवस पृथ्वीच्या प्रदक्षिणा करीत राहील. इस्रोची ही मोहीम म्हणजे जगातील सर्वांत कमी खर्चाची मानवी मोहीम असणार आहे.

मानवापूर्वी भारताकडून अंतराळात निघालेली व्योममित्र ही हाफ ह्युमनॉइड रोबो आहे. या ह्युमनॉइडमध्ये मानवी शरीराशी संबंधित काही उपकरणे जोडण्यात आली आहेत. मानवी संरचनेवर अंतरिक्षात होणारे परिणाम या उपकरणांमध्ये नोंदविले जाणार आहेत. भारतीय अंतराळवीर गगनयान मोहिमेअंतर्गत सात दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत राहणार आहेत. या कालावधीत त्यांच्या शरीरावर कोणते परिणाम होतील, याची माहिती व्योममित्राच्या माध्यमातून आधीच इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे असेल. शरीराच्या तापमानापासून हृदयाच्या गतीपर्यंत जे काही परिणाम मानवी शरीरावर सात दिवसांत होतील, त्याचे मापन व्योममित्रा करणार आहे. त्यामुळे अंतराळवीराना पाठविताना पुरेशी खबरदारी घेणे शक्‍य होईल. रशियाने जेव्हा मानवासारखा दिसणारा रोबो (फेडोर) अंतरिक्षात पाठविला होता, तेव्हा यानातील पायलटच्या सीटवर त्याला बसविण्यात आले होते. तो रोबो “चला, निघू या’ हे वाक्‍य वारंवार म्हणताना आढळला होता. पहिला अंतराळवीर युरी गागरिन यांचे हे वाक्‍य रोबो म्हणत होता, हे विशेष. एकंदरीत, मानवी मोहीम सुरू करण्यापूर्वी व्योममित्र हा ह्युमनॉइड शास्त्रज्ञांना बरीच मदत करणार आहे. व्योममित्राच्या या अंतराळवारीचे सर्वांनाच कुतूहल वाटत आहे.

प्रा. विजया पंडित

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.