मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. तरी कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक टीका केली आहे.
घरातील बायको एवढी रुसत नसेल तेवढे हे मंत्री रुसत आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. “अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र सध्या शिंदे-भाजपा यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत. घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगत आहेत,” अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.
मंत्रीपद मिळूनही कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे काही मंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री संदीपान भुमरे तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे, असे म्हटले जात आहे. नाराजीच्या चर्चेनंतर या मंत्र्यांनी आम्ही नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.