शालेय क्रॉसकंट्री स्पर्धेत इंगळे व गोडसे विजेते

पुणे – तन्वी इंगळे व नकुल गोडसे यांनी शिवरामपंत दामले स्मृती आंतर शालेय क्रॉसकंट्री स्पर्धेतील अनुक्रमे 15 वर्षाखालील मुली व मुलांच्या गटात प्रथम स्थान घेतले. महाराष्ट्रीय मंडळ व कटारिया प्रशालेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कटारिया प्रशालेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 66 शाळांच्या 1900 खेळाडूंनी भाग घेतला. ही स्पर्धा पुणे शहर व पुणे ग्रामीण या दोन विभागात घेण्यात आली.

स्पर्धेतील 15 वर्षाखालील गटात तन्वीने 2 किलोमीटर अंतराची शर्यत 8 मिनिटे 52 सेकंदात पार केली. गायत्री बरडे व निकिता गिते यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. ग्रामीण विभागात कशिश जमादारने प्रथम स्थान घेताना हीच शर्यत 8 मिनिटे 2 सेकंदात पूर्ण केली. चैत्राली करे व पायल हरपळे यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळविले.

मुलांसाठी 3 किलोमीटर अंतराची शर्यत घेण्यात आली. त्यामध्ये गोडसेने विजेतेपद मिळविताना 10 मिनिटे 39 सेकंद वेळ नोंदविली. गौरव भोसलेने दुसरा क्रमांक पटकाविला तर दर्शन माटेने तिसरे पारितोषिक घेतले. ग्रामीण विभागात अंकुश झिरवाने 3 किलोमीटर अंतर 10 मिनिटे 35 सेकंदात पूर्ण केले. शैलेश सोमण व केतन माढवे हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

स्पर्धेतील 13 वर्षाखालील मुलींमध्ये श्रावणी जाधवने 2 किलोमीटरची शर्यत 8 मिनिटे 2 सेकंदात पार करीत प्रथम क्रमांक घेतला. वेदिका पुजारी व श्रेया मालुसरे यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. ग्रामीण विभागात किमया खेडेकर, ऐश्‍वर्या हिंगे व तनुजा हांडे यांनी अनुक्रमे पहिली तीन बक्षिसे घेतली.

स्पर्धेचे उद्‌घाटन डॉ. शिरीष पाठक यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभ आंतरराष्ट्रीय धावपटू राहुलकुमार पाल याच्या हस्ते झाला. यावेळी मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले उपस्थित होते.

गटवार निकाल – 11 वर्षाखालील मुली-शहर विभाग-1. आर्शिया पवार, 2. कृष्णाली जगताप, 3.हर्षिता पांडे. ग्रामीण विभाग-1. ज्ञानेश्‍वरी फडतरे, 2. अंकिता माळी, 3. आर्या सुपेकर. मुले-शहर विभाग-1. प्रिन्स यादव, 2.अविनाश उभे, 3. पार्थ श्रीवास्तव. ग्रामीण विभाग-1.रितिक खामया, 2. निर्मित निनावे, 3.संकेत खामया. 13 वर्षाखालील मुले-शहर विभाग-1. रोहित वर्मा, 2. आकाश साळुंखे, 3. सूरज निसार. ग्रामीण विभाग-1.करण भोये, 2. विनायक राजशिर्के, 3.अंकुश बसवत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.