नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने आर्थिक कोंडी
पिंपरी – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने नाट्य, लावणी कलावंत, नृत्य कलाकार, लोककलावंत, पडद्यामागील कलाकारांची सध्या आर्थिक कोंडी झाली आहे. नाट्यगृहे सुरू करावी, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, या मागण्यांसाठी कलाकारांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता कलाकार पारंपारिक वेशभूषेत आंदोलन करणार आहेत.
लॉकडाऊन सुरू होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यगृहे सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे अनेक कलाकारांची कामे बंद पडली आहेत. जमविलेली बचत, दागदागिने विकून उदरनिर्वाह करण्याची काही कलाकारांवर वेळ आली आहे. मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, घराचा हप्ता, उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च जुळवता जुळवता त्यांना नाकीनऊ आले आहे. सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. कोणीही वाली राहिलेला नाही, अशी कलाकारांची भावना झाली आहे. त्यामुळे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांकडे कलाकार आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड आर्टिस्ट संघटना आणि विविध कलाकार असे एकूण 25 कलाकार या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
कलाकारांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. नियम व अटी घालून नाट्यगृहे व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करावी, या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांना गाऱ्हाणे मांडणार आहोत.
– चंद्रा पवार, कार्याध्यक्ष, पिंपरी-चिंचवड कलाकार महासंघ.
नाट्य कलावंत, पडद्यामागील कलाकार यांची नाट्यगृहे बंद असल्याने मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना सरकारने आर्थिक मदत करायला हवी. त्यांचा सध्या कोणीही वाली राहिलेला नाही. नाट्यगृहे सुरू झाल्यास त्यांची सोय होऊ शकणार आहे.
– उमेश राणे, साऊंड इंजिनियर.