नवी दिल्ली – महिलांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सुमार कामगिरी केल्यावर भारताच्या महिला संघात तसेच सपोर्ट स्टाफमध्ये काही मोठे बदल होत आहेत. संघाचे प्रशिक्षक व माजी रणजीपटू रोमेश पोवार यांची मुदत संपल्यामुळे त्याच्या जागी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती होणार आहे. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांना संघाचे मेंटॉर म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्ती केले जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
महिला विश्वकरंडक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर अनेक बदल होणार आहेत. मात्र पोवार बीसीसीआयच्या नियमांनुसार पुन्हा मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात. डब्ल्यूव्ही रमन यांच्या जागी पोवारची नियुक्ती करण्यात आली होती. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने 2020 साली टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
पोवारचा कार्यकाळ विश्वकरंडक स्पर्धेपर्यंतच होता. हा कार्यकाळ वाढवला जाणार नसून नव्याने प्रशिक्षक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्थात पोवार पुन्हा पदासाठी अर्ज करू शकतो आणि क्रिकेट सल्लागार समिती घटनेनुसार यावर निर्णय घेऊ शकते.
कर्णधार मिताली राजशी वाद झाल्यानंतरही रमन यांना डावलून पोवारकडे प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती.
पोवार यांनी महिला संघाचे प्रशिक्षकपद दोन कार्यकाळ भूषवले. यापैकी दुसऱ्या कार्यकाळात पोवारच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने प्रत्येक मालिका गमावली आणि आता विश्वकरंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यातही अपयश आले. पुढील वर्षी 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय क्रिकेटपटूंची नवीन पिढी घडविण्यासाठी लक्ष्मणकडे प्रस्ताव देणार आहे.