पाटसच्या लालमातीत हरियाणा केसरी चितपट

महाराष्ट्राचा माऊली जमदाडे विजयी

वरवंड- पाटस गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात महाराष्ट्राचा पैलवान माऊली जमदाडे आणि हरियानाचा पैलवान हरियाणा केसरी मोहित कुमार यांच्यात प्रथम क्रमांकाची 1 लाख 51 हजार रुपये ईनामाची कुस्ती झाली. या चित्तथरारक कुस्तीत माऊली जमदाडे याने चपळाईने दुहेरी पटावर मोहित कुमार यास चितपट केले. माऊली जमदाडे याने कुस्ती जिंकताच कुस्तीप्रेमी प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

दौंड तालुक्‍यातील पाटस गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांच्या यात्रे निमित्ताने जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. पाटस गावातील कुस्ती आखाडा सर्वत्र प्रसिद्ध आहे. पाटस बरोबरच तालुक्‍यातील कुस्तीप्रेमी आवर्जून या आखाड्याला येत असतात. दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही लाखो रुपयांचे इनाम नामांकीत मल्लांच्या कुस्तिवर ठेवण्यात आला होते. यामुळे पाटस येथील कुस्ती आखाड्याबाबत कुस्तीप्रेमींना मोठी उत्सुकता होती.
पाटसच्या आखाड्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती संतोष सुतार विरुद्ध समीर देसाई या दोन मल्लांमध्ये झाली. या कुस्तीवर पाटस ग्रामस्थांनी 1 लाख 21 हजार रुपये ईनाम ठेवला होता. या कुस्तीत संतोष सुतार विजयी झाले. तर तृतीय क्रमांकाची एक लाख रुपये ईनामची कुस्ती नामदेव कचरे यांनी मारली. आखाड्यात पंच म्हणून अरुण लक्ष्मण भागवत, सोपान पांडुरंग मोहिते, बापू भांडलकर, स्वप्नील भागवत, संतोष भागवत, गणेश भागवत यांनी काम पाहिले. पाटस येथील कुस्ती आखड्यात शंकर आण्णा पूजारी, नितीन शितोळे देशमुख आणि साहेबराव वाबळे यांनी समालोचन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.