लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न

मानाच्या सासनकाठीचे जिल्हाधिऱ्यांच्या हस्ते पूजन

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासनकाठी क्रमांक एक या मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले.

यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार सत्यजित पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाडगे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री जोतिबा यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा कुलस्वामी श्री जोतिबाच्या यात्रेसाठी लाखो भाविक जमले असून, या यात्रेचे जिल्हा प्रशासन देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीने नेटके नियोजन केले आहे. पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. उन्हाळा असल्याने भाविकांनी सुखरुप, शिस्तबध्दरित्या आणि शांततेत यात्रा पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ते म्हणाले, चैत्र यात्रेचा आजचा प्रमुख दिवस असून कालपासून लाखो भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेतले आहे. जोतिबाची यात्रा आनंदी वातावरणात आणि सुखरूपपणे पार पाडण्यात भाविकांनी केलेले सहकार्य मोलाचे आहे.

श्री जोतिबाची यात्रा मोठ्या भक्ती भावाने, उत्साहाने होत असून यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी प्रशासनाने उत्तमरितीने घेतली आहे. भाविकांना कसलाही त्रास होवू नये यासाठीही आवश्यक दक्षता आणि काळजी देवस्थान समिती, ग्रामपंचायत आणि प्रशासनाने घेतली आहे. यापुढेही कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी केले.

जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आदि राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली. उंच सासनकाठ्या नाचवत व गुलाल-खोबरे उधळत भाविक देहभान विसरुन यात्रेत सहभागी झाले होते. विविध रंगांच्या सासनकाठ्यांमुळे जोतिबा मंदिराची शोभा वाढली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह अन्य मान्यवरांचे स्वागत केले.

श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी सहजसेवा ट्रस्टच्यावतीने गायमुख परिसरात सुरू केलेल्या अन्नछत्रास जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सदिच्छा भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्याहस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. या ठिकाणी राजर्षि छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालय व सी. पी. आर. हॉस्पिटल यांच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान फिरत्या वाहन उपक्रमास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, तहसिलदार रमेश शेडगे,नायब तहसिलदार अनंत गुरव, सहज सेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे, प्रमोद पाटील तसेच ट्रस्टचे अन्य पदाधिकारी, उपस्थित होते. यानंतर जोतिबा डोंगरावरील एसटी स्टॅड परिसरात आर.के.मेहता चॅरीटेबल स्ट्रस्टच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत अन्नछत्राचा शुभारंभही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आर.के.मेहता चॅरीटेबल स्ट्रस्टचे प्रमुख आर.के. मेहता, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, तहसिलदार रमेश शेडगे,नायब तहसिलदार अनंत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.