-->

पर्वती मतदारसंघात सुरू आहे राजकीय पक्षांकडून चाचपणी

उपनगर वार्तापत्र (बिबवेवाडी) :  हर्षद कटारिया

भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या पर्वती मतदार संघात राजकीय घडामोडींसह धुसफुस सुरू झाली आहे. भाजप बळकीटवर भर देत असताना विरोधकही मतदार संघात आक्रमक होऊ लागले आहेत. मतदार संघात मागील अनेक वर्षांत कोणताही मोठा शासकीय प्रकल्प झाल्याचा नसल्याचा मुद्दा उचलून धरत विरोधक नागरिकांचा कल जाणून घेत आहेत. तर, याच गणितावर काहीजण निवडणूक तिकीटासाठी अंदाज घेत या-त्या पक्षाची चाचपणीही करीत आहेत.

पर्वती मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे 23 नगरसेवक विरोधकांपेक्षा तुल्यबळ मोठे आहे. मागील निवडणुकीत नमो लाटेचा फटका बऱ्याच उमेदवारांना बसला. विधानसभा निवडणुकीनंतर काहीसे वेगळे चित्र दिसू लागले. राज्यात महाविकास आघीचे सरकार आल्यानंतर विरोधक अर्थातच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही बळ मिळाले आहे. यातून पुणे महापालिका ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली आहे.

तर, भाजपकडूनही एकजुटीने कामकाज सुरू झाले आहे. पर्वती मतदार संघातील पदे वाटपातून काही कार्यकर्ते नाराज झाले होते परंतु, त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले. यातून भाजपमध्ये दिसलेल्या पक्षशिस्तीचा फायदा नक्कीच निवडणुकीत उमेदवारांना मिळेल, अशी खात्री पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाटते आहे.

त्यातही आंबील ओढा पूरस्थिती त्यानंतरच्या काळात येथील रखडलेली विकासकामे परिसरातील व्यापारी, उद्योजकांच्या समस्या केवळ चमकोगिरीवर करण्यात आलेली लाखो रुपयांचे उधळपट्टी, कायम असणाऱ्या मूलभूत समस्या, रखडलेली आणि दुर्लक्षित झालेली विकासकामे हे विरोधकांची मुद्दे असताना यावर भाजपला उत्तरे शोधावी लाणार आहेत.

कॉंग्रेसच्या बैठका वाढल्या…
शेतकरी कायदा, पेट्रोल दरवाढ, महागाई अशा अनेक जीवनाश्‍यक विषयांवर कॉंग्रेसकडून जोरदार आंदोलने आणि निषेध करणे मतदार संघात करण्यात आली आहेत. यातून नागरिकांत होणाऱ्या मत परिवर्तनाचा लाभ होईल, अशी आशा कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांन वाटते. कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या बैठकीमध्येही पर्वती मतदार संघातील प्रश्‍नांसह येथे नगरसेवकांचे संख्या बळ वाढविण्याबाबत विशेष लक्ष दिले जात आहे. यातून पक्षांच्या बैठकींची संख्याही गेल्या काही महिन्यांत वाढल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीला मोठी आशा…
मागील महानगरपालिका निवडणुकीत पर्वती मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपयश आले होते. फक्त दोन नगरसेवकांवर समाधान मानावे लागले. पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोड्या आणि वर्चस्व वादातून मतांचा फटका पक्षाला बसला होता. परंतु, गेल्या काही वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. राज्यात सत्ता असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.

शिवसेनेला मेहनत करावी लागणार…
शिवसेनेकडून मागील विधानसेभेत युती धर्म पाळण्यात आल्याने आमच्यावर नेहमीच निवडणुकीवेळी तिकीट मिळण्याबाबत अन्याय झाला असल्याचे अनेकांचे ठाम म्हणणे आहे. मात्र, यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढवायची असेल तर याबाबत पक्षाने आताच ठाम निर्णय गरजेचे असल्याचा आग्रह शिवसैनिकांकडून धरला जात आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येतील की नाही, याबाबतचा निर्णय सर्वेसर्वा मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याने कामाची दिशा ठरणे अवघड अससल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर, पक्षवाढीसाठी जोमाने काम करा, अशा सूचनाही दिल्या जात आहेत. मतदार संघात सध्या एकच नगरसेवक असल्याने शिवसेनेला मेहनत करावी लागणार हे नक्की आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.