निमसाखरमध्ये जातीपातीला थारा नसतो

निमसाखर येथील सभेत आमदार भरणे यांचे वक्‍तव्य

रेडा – निमसाखर हे गाव असे आहे की, येथील गावकरी कधीही जातीपातीला थारा देत नाहीत. जाती-पातीला मूठमाती देऊन एक वेगळा आदर्श निर्माण करणारी खानदानीजनता या भागात असल्यामुळे या गावाच्या विकासासाठी निधी देताना मी कधीही कुचराई केलेली नाही. या गावकऱ्यांनी प्रेम दिले आहे, हे कधीही विसरणार नाही, अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. याप्रसंगी गावातील सोसायटीचे अध्यक्ष विजयसिंह रणवरे, हनुमंतराव रणसिंग, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत रणवरे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वीरसिंह रणसिंग, यशवंत सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार रणवरे पाटील, सुरेश लवटे, रामभाऊ रणसिंग, दीपक लवटे, गोरख शेळके, जयंत मोरे, भगवानराव रणसिंग व परिसरातील हजारो मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार भरणे म्हणाले की, निमसाखर गावातील जलतज्ज्ञ व 22 दुष्काळी गावातील पाण्याचे अभ्यासक स्व. सूर्यकांत रणवरे यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला, त्यामुळेच या भागात पाणी मिळाले. दुष्काळी 22 गावांसाठी शासनाकडे 3 योजना मांडल्या आहेत, त्यापैकी एक योजना तर तात्काळ मंजूर होईल, त्यामुळे आगामी काळात फक्‍त पाण्यासाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी आहे. शेतकऱ्यांची शेती फुलवण्यांसाठी शेतात पाणी पोहोचणार असा शब्द आमदार भरणे यांनी दिला. उजनी धरणातून पाणी माढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी त्याकाळी नेले. याच कालावधीत हर्षवर्धन पाटील देखील मंत्रिमंडळात होते; मात्र त्यांनी काही इंदापूर तालुक्‍याचा विचार केला नाही का ? उजनीतून पाणी तालुक्‍याच्या हितासाठी आणले नाही, असाही सवाल आमदार भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना केला.

दुष्काळ काय आमदार पाडतो का?
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या झोनमध्ये निमसाखर गाव नव्हते; मात्र येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी या भागातील शेतकऱ्यांची उसाची अडचण येऊ नये म्हणून हे गाव छत्रपती कारखान्याच्या झोनमध्ये घेतले आहे. मी आमदार असताना कधीही गटाचा जातीपातीचा विचार केलेला नाही, त्यामुळे समाजातील सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचला आहे. असे असताना देखील विरोधी उमेदवार हे पाण्याचे राजकारण करताना दिसतात. मात्र, दुष्काळ काय तालुक्‍याचा आमदार पाडतो का? असा सवाल आमदार भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना केला.

Leave A Reply

Your email address will not be published.