मुंबई : शेफ विकास खन्नाने दिग्दर्शित केलेल्या “द लास्ट कलर’ या पहिल्याच सिनेमाला ऑस्कर पारितोषिकांच्या पुढच्या फेरीमध्ये निवडले गेले आहे. नीना गुप्ताचा लीड रोल असलेल्या या सिनेमातील एक फोटो विकास खन्नाने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला आणि ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.
एका लांबलचक पोस्टमधून विकास खन्नाने शेफगिरी सोडून चित्रपट दिग्दर्शनाकडे वळण्याच्या आपल्या निर्णयाबाबत सांगितले आहे. “मिशलेन स्टार असताना दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पडण्याचा धोका कोणीही पत्करणार नाही. मात्र माझ्या आतल्या आवाजाने मला हा निर्णय घ्यायला लावला. आता माझा सिनेमा ऑस्करसाठी पात्र ठरला आहे.
‘ असेही विकास खन्नाने म्हटले आहे. गंगेच्या तीरावर बसूनच त्याने या सिनेमाची कथा, पटकथा, डायलॉग, कल्पनेतील पात्रे, संगीत सर्वकाही लिहून काढले. “द लास्ट कलर’नेच आपल्या पुन्हा जिवंत केले. या कथेनेच आपल्यासाठी अंगाई गायली, इतके या गोष्टीशी आपण एकरूप झालो होतो, एखाद्या वैश्विक शक्तीनेच आपल्याकडून या सिनेमाचे दिग्दर्शन करून घेतल्याचे त्याने म्हटले आहे.
लीड रोल करणाऱ्या नीना गुप्ताला तर हा सिनेमा ऑस्करसाठी पात्र ठरल्यावर विश्वासही बसत नाही आहे. “द लास्ट कलर’ भारतातल्या थिएटरमध्ये रिलीज झाला नाही. पण मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचा प्रिमिअर झाला होता.