येत्या चार दिवसांत राहुल गांधी प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतील – पृथ्वीराज चव्हाण

कराड – कॉंग्रेस पक्षामध्ये पूर्वीपासून एक व्यक्‍ती, एक पद अशी संकल्पना कार्यरत आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधानसभेतील गटनेते, प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री अशी तीन पदे आहेत.

त्यामुळे कोणत्याही एका पदाला योग्य पद्धतीने न्याय देता येत नाही, असे काहींचे म्हणणे होते. परंतु कॉंग्रेस नेते राहुल गांधी येत्या चार ते पाच दिवसात याबाबतचा निर्णय घेतील असे स्पष्ट संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

पत्रकार दिनानिमित्त कराड शहरातील पत्रकारांचा सत्कार केल्यानंतर अनौपचारिक चर्चा करताना ते बुधवारी बोलत होते. चव्हाण म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मला विधानसभा सभापतीपदाबाबत विचारणा करण्यात आली होती.

पण सक्रिय राजकारण आणि विधानसभा मतदारसंघाला जास्त वेळ देता आला नसता, म्हणून आपण सभापतीपद नाकारले होते. त्यामुळे आपणास सभापतीपदात रस नसल्याचेच अप्रत्यक्षरित्या पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

एक व्यक्‍ती, एक पद याबाबत कॉंग्रेसमध्ये पूर्वीपासून विचार सुरू आहे. करोना संसर्ग कमी झाल्याने आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे आता जबाबदारीचे विभाजन करावे का? याबाबतची प्रक्रिया वरिष्ठ स्तरावर सुरू करण्यात आली आहे. जबाबदारीचे विभाजन होईल की नाही? हे माहिती नाही.

पक्षश्रेष्ठींच्या विचारानुसार आता याबाबत विचार सुरू झाला आहे. कॉंग्रेसचे राज्य प्रभारी एच. के.पाटील यांनी याबाबत आमदारांची मते जाणून घेतली आहेत. त्यामुळे आता सुरु असलेल्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत ठोस निर्णय होईल की नाही, हे आपणास माहिती नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील आणि काही दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.