नगर – शहरात अनेक विद्यालये – महाविद्यालये आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी खेड्यातून या शहरात येतात. बसस्थानक, महाविद्यालये या ठिकाणी सडक छाप रोमिओ मुलींची टिंगल टवाळी करतात. शहरातील रस्त्यांवर बेफाम वाहने चालवत मुलींचा पाठलाग करणे, छेड काढणे, अश्लील कमेंट करणाऱ्या रोड रोमिओवर कडक कारवाई करण्याची मागणी होते असतांना जानेवारी महिण्यात निर्भया पथकाने 291 रोडरोमिओंवर कारवाई केली. तर यापुर्वी डिसेंबरमध्ये 562 रोडरोमिओंवर निर्भया पथकाने कारवाई केली.
शहरातील न्यू आर्ट कॉलेज, पेमराज सारडा कॉलेज, फिरोदिया कॉलेज, नगर कॉलेज या कॉलेजसह 65 शाळा महाविद्यालये आहेत. या ठिकाणी शाळाबाह्य रोडरोमिओंचा उच्छाद नेहमी सुरू असतो. हे शाळाबाह्य रोडरोमियो शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळात महाविद्यालयाच्या परिसरात घिरट्या घालतात. महाविद्यालयाच्या परिसरात बिनदिक्कतपणे वावरतांना दिसतात. मध्यंतरी मुलींना त्रास देण्याचे प्रकार वाढले होते.
त्यानंतर मात्र शाळा, महाविद्यालयांतील मुलींना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निर्भया पथकाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. मुलींना त्रास देणाऱ्यांवर वचक राहण्यासाठी त्यांच्याकडून समजपत्र भरून घेतले जातात. शिवाय त्यांचे समपुदेशन करण्यात येत. गेल्या दिड महिण्यात मुलींना त्रास देणाऱ्या 501 तरुणांच्या पालकांना बोलावून पालकांसमारेच तरूणांचे निर्भयाने समुपदेशन केले.
पालकापुढे समज दिल्यानंतर काहींमध्ये सुधारणा झाल्या असून, ते महाविद्यालय-शाळांकडे फिरकत नसल्याची माहिती निर्भया पथकाडून मिळाली. निर्भया पथकाकडून दिवसाकाठी पंधरा ते वीस रोडरोमिओंवर कारवाई केली जाते, असे निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
केवळ शाळा महाविद्यालयच नाहीत तर शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी निर्भया पथक फिरते. यात नगर शहरातील तारकपूर, पुणे, माळीवाडा या तीनही बसस्थानकांसह शहरातील बागांमध्ये देखील जाऊन गस्त घातली जाते. काही गैरवर्तन आढळून आल्यास निर्भया पथक कारवाई करते.
रोडरोमिओंना आळा घालण्यासाठी दिलासा पथक सक्रिय असून शहरातील शाळा महाविद्यालयामध्ये निर्भया पथक राऊंड मारते. हैद्राबादला काही दिवसापूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती, त्यामुळे शहरातील मुलींनी देखील धास्ती घेतली होती. त्या दरम्यान आपण पेट्रोलिंग वाढवले होते. शिवाय निर्भया पथकाने देखिल कडक कारवाईला सुरूवात केली. मुलींनी भीती न बाळगता तक्रार करावी. आणि मुलांना हे सांगणं आहे की, मुलींना त्रास देवू नका, अन्यथा निर्भयाकडून कडक कारवाई करण्यात येईल. आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल, असं वागू नका.
जयश्री काळे दिलासा पथक (पोलीस उपनिरीक्षक)
महाविद्यालयाच्या परिसरात कायम शाळाबाह्य रोडरोमिओंचा वावर असतो. मुलींना बघून कमेंट करणे, पाठलाग करणे, छेड काढणे असे प्रकार सर्रास घडतात. महाविद्यालयाच्या परिसरात अशा टुकार मुलांचे येणे बंद होणे गरजेचे आहे. बहुतेकदा मुलांची तक्रार केल्यानंतर त्यांना समज देण्यापलीकडे फारशी कडक कारवाई होत नाही. त्यामुळे, मुलांचं फावतं, ते पुन्हा त्यांचे उपद्रव चालू ठेवतात. त्यामुळे असं होऊ नये म्हणून निर्भयाने कडक कारवाई करावी.
महाविद्यालयीन विद्यार्थिनी