मंडईचे गाळे आमदार, नगरसेवकांच्या नावावर

आयुक्‍तांच्या तपासणीत नागरिकांनीच दिली माहिती

पुणे – महापालिकेच्या महात्मा फुले मंडईतील भाजी विक्रेते तसेच व्यावसायिक म्हणून शहरातील माजी आमदार तसेच नगरसेवकांच्या नावावर असल्याचा प्रकार समोर आला आहे. आयुक्‍त सौरभ राव यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता अचानक मंडई परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंडई विभागाच्या कार्यालयातील रेकॉर्ड तपासले असता; आमदार तसेच नगरसेवकांची नावे दिसून आल्याने तसेच गाळ्यांमधील व्यावसायिकांनी कोणाची मालकी हे सांगितल्याने आयुक्‍तांसह उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे किमान आमदार आणि नगरसेवक झाल्यानंतर नाममात्र दराने घेतलेले हे गाळे नैतिकता म्हणून तरी परत का दिले नाहीत? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आयुक्‍त राव यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांसह महात्मा फुले मंडईची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंडईचे गाळे, त्या ठिकाणी असलेली स्वच्छता, गाळ्याबाहेर करण्यात आलेले अतिक्रमण, गाळ्याचा प्रत्यक्ष केला जाणारा वापर तसेच मंडई विभागाच्या कार्यालयाची पाहणी केली. ही माहिती घेत असतानाच त्यांनी गाळे वाटपाचे रेकॉर्ड पाहिले असता, तसेच माहिती घेतली असता, काही गाळे माजी आमदारांच्या नावावर भाडेकराराने देण्यात आल्याचे आढळले. तसेच, काही नगरसेवकांची नावेही यावेळी आढळून आली. त्यामुळे आयुक्‍तांनीही याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त केले. त्यामुळे एका बाजूला मिळकतींचे सर्वेक्षण करून कोट्यवधींचा खर्च सल्लागारांच्या खिशात घालण्यासाठी महापालिका तयार असली तरी, बहुतांश गाळ्यांवर अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्याच ताब्यात असल्याने, त्यांचे आर्थिक उत्पन्न तसेच गाळे वाटपाची नियमावली लक्षात घेऊन प्रशासन हे गाळे काढून त्याचे वाटप गरजूंना करणार का? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

गुरुवारी सकाळी महात्मा फुले मंडईची अचानक पाहणी केली. यावेळी काही गाळे आमदार, नगरसेवकांकडे असल्याचे दिसून आले. तसेच काही गाळेधारकांनीही याची माहिती दिली. तर पाहणीवेळी अनेक गाळे बंद असल्याचे तसेच त्याचा गोडाऊन म्हणून वापर होत असल्याचे चित्र आहे. या शिवाय, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही झाले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊन गरजूंना या मंडईच्या सुविधेचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले जातील. वेळप्रसंगी आमदार तसेच नगरसेवकांशीही चर्चा केली जाईल
– सौरभ राव, महापालिका आयुक्‍त

गाळेधारकांवर दंडाची कारवाई
आयुक्‍तांनी गाळेधारकांना कचरा वर्गीकृत करून देण्याबाबत आणि स्वच्छता राखण्याबाबत सूचना दिल्या. कै. सतीशशेठ मिसाळ पार्किंगमध्ये असणाऱ्या अस्वच्छतेबाबत पार्किंगचे ठेकेदार निखील जगताप यांना 5 हजार रुपये दंड केला. तसेच शिवाजी रस्त्यावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केली असता त्याठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याने संबंधित वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे कचऱ्यासाठी बकेट न ठेवणे, प्रबोधनात्मक बोर्ड न लावणे, परिसर अस्वच्छ ठेवणे यासाठी 3 गाळेधारकांना आणि नागरिकांकडून 15 हजार रुपये दंड जागेवर वसूल केला. पुढील काळामध्ये सार्वजनिक स्वच्छतेची कार्यवाही तीव्र करण्यात आली असून, सातत्याने पाहणी करून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्‍तांनी सांगितले.

आरोग्य निरीक्षकाचा अडाणीपणा उघड
आरोग्य निरीक्षकांना दंड आकारायला सांगून, पावती फाडायला सांगितली. मात्र, त्या पावतीवर ज्याला दंड करायचा आहे त्याचे नाव कोठे लिहायचे हेच त्या निरीक्षकाला माहित नव्हते. एवढेच नव्हे तर दंडाची रक्‍कम कोणत्या रकान्यात लिहायची हे देखील त्याला समजले नाही. त्यावर कहर म्हणजे पावती पुस्तकातून पावती कशी फाडायची हे न समजल्याने त्याने पावतीही मधोमध फाडली. यावरून निरीक्षक खरेच मंडईत कारवाईला जात असतील का, पावती पुस्तक हातात तरी घेतले असेल का, याचे उत्तर आयुक्‍तांना न सांगताच मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.