पिस्तूलातून वाहनावर गोळ्या झाडून केला होता जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
पुणे : वाहनावर पिस्तूलामधून गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात रिझवान ऊर्फ टिपू पठाण टोळीतील दोघांना जामीन विशेष मोक्का न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी फेटाळला. अजिंक्य ऊर्फ चिम्या बाळासाहेब उंद्रे आणि (वय 20, रा. मांजरी खुर्द) आणि सोहेल अनिस पठाण (वय 23, रा. हडपसर, मूळ रा. लातुर) अशी जामीन फेटाळलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत 25 वर्षीय बिल्डरने वानवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना 5 जानेवारी 2019 रोजी रात्री 12.30 ते 1 या कालावधीत सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर येथील एका बंगल्यात घडली. या प्रकरणात दोघांसह 15 जणांवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादींच्या भाववंद आणि नातेवाईकांना मारहाण केल्याचे समजल्यानंतर बहिणीला घेऊन फिर्यादी त्यांच्या बंगल्यात गेले.
त्यावेळी रात्री 15 ते 20 मुले आली. बंगल्याचे गेटवर तलवारी, कोयत्याने वार केले. दोघा-तिघांनी आत घुसून फिर्यादींना मारहाण केली. वॉचमनच्या मदतीने फिर्यादींनी आरोपींना बाहेर काढले. त्यावेळी एकाने फिर्यादींना पिस्तूल दाखविले. त्यानंतर फिर्यादींनी गाडी सुरक्षित ठेवण्याकरिता गेट बाहेर काढली.
त्यावेळी एक आरोपी बुलेटवर आला. त्याने फिर्यादींचा पाठलाग केला. त्यांच्या वाहनावर तीन गोळ्या झाडल्या, तलवार, कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने वार करून दशहत निर्माण केली. या प्रकरणात सर्वांना मोक्का लावण्यात आला आहे. त्यामध्ये दोघांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
या अर्जास मोक्काचे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. दोघांच्या नावाने फिर्याद देण्यात आली आहे. दोघेही रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण टोळीतील सक्रीय सदस्य आहेत. ओळख परेडच्या वेळी दोघांना ओळखण्यात आले आहे. दोघांवर प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे दोघांचा जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. प्रमोद बोंबटकर यांनी केली. यावर सुनावणी करत न्यायालयाने आदेश दिला.