पुणे – वाद मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेल्या महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मोक्का) गुन्ह्यातील आरोपीला विशेष न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी जामीन मजुर केला आहे.
अवि ऊर्फ अविष्कार राजकुमार साळूंके (वय 23 रा. निगडी) असे त्याचे नाव आहे. तो आरटीओ एजंट आहे. त्याने ऍड. मिलिंद पवार, ऍड. अनिकेत जांभुळकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. साळूंके हा निगडी परिसरातील गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता.
1 नोव्हेंबर 2017 रोजी फिर्यादी हनुमंत भगवान शिंदे (वय 41 रा. देहूरोड) यांना आप-आपसातील वाद मिटविण्यासाठी आरोपींनी बोलावून घेतले. तिथे काही आरोपींनी पिस्तुल मधून गोळीबार करून शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी तलवार कोयता, लाकडी दांडक्याने पाठलाग करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पळून गेल्याने फिर्यादी वाचले, अशी फिर्यादीत म्हटले आहे. शिंदे यांनी 3 नोव्हेंबर 2017 रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार 7 डिसेंबर 2017 रोजी साळुंके याला अटक करून पोलिसांनी मोक्का लावला. साळुंकेच्या विरोधात एकही गुन्हा प्रलंबित नाही किंवा तो संघटित गुन्हेगारीचा सदस्य असल्याचे सरकार पक्षाने सिध्द केलेले नाही. जाणीवपूर्वक मोक्का कायदा लावल्यामुळे आरोपी जवळपास दोन वर्षापासून न्यायालयीन कोठडीत आहे. मोक्का कायदा हा या आरोपीला लागू होतच नाही, असा युक्तिवाद ऍड मिलींद पवार यांनी केला.