नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने बनवलेले करोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
मंगळवारी बाबा रामदेव यांनी समारंभपूर्वक करोनिल औषधाचे लाँचिंग केले. “करोनावर १०० टक्के लागू होणारं औषध आणि ७ दिवसांत करोना बरा होईल,” असा दावाही रामदेव बाबा यांच्या पतंजलीने केला होता. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या औषधाच्या चाचण्यांचे सर्व रिपोटर्स मागवले तसेच करोनामधून मुक्ती देणारे औषध अशी जाहीरात बंद करण्याचेही आदेश दिले होते.
जयपूरच्या ज्योतिनगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात करोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयर नोंदवण्यात आला आहे. बाबा रामदेव आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याच्या वृत्ताला ज्योति नगर पोलीस ठाण्याचे एसएचओ सुधीर कुमार उपाध्याय यांनी दुजोरा दिला. बलराम जाखर यांनी हा एफआयआर नोंदवला आहे.