वंदना बर्वे
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपुआचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्यास सपशेल नकार दिला आहे. दरम्यान, पवार यांनी कॉग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या नावाचा विचार करण्याची सूचना केली असल्याचे वृत्त आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी आणि डी. राजा यांनी आज शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. उभय नेत्यांमध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संपुआच्या संभाव्य उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. परंतु, पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नसतील. अन्य नावांवर विचार केला जात आहे, असे येचुरी यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
परंतु, माकपा नेत्यांशी चर्चा करताना शरद पवार यांनी कॉग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या नावाचा विचार करायला हरकत नसल्याचे सांगितले असल्याचे समजते. कॉग्रेसकडून आझाद यांना राज्यसभेत पाठविले जाईल, अशी चर्चा होती. परंतु, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.