जुन्नर – शिवनेरी येथे शिवजयंतीच्या सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत कार्यकर्त्यांना कडक शब्दात झापले. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना काही तरुणांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यामुळे अजित पवारांच्या भाषणात व्यत्यय आला. तेव्हा पवार संताप म्हणाले,’मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रतिप्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत केला.
मिळालेल्या माहितीनुसार,’तेथे उपस्थित एका व्यक्तीकडून मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी त्या व्यक्तीला खाली बसायला सांगितले. काही वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यानंतर अजित पवार संतापले. म्हणाले,’तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का असे त्या व्यक्तीला अजित पवारांनी खडसावले. आज शिवजयंती आहे. असे चालणार नाही. असे त्यांनी म्हटले. मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ?
पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना ? इतर कुठल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा सामाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भुमिका आहे. मात्र, प्रश्न न्यायालयात अडकला आहे. नियमात बदल करून आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारकडून नियमातच बदल करावा लागेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.