बंगळुरू : कर्नाटक विधानपरिषदेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेस आमदारांनी उपसभापतींनाच त्यांच्या खुर्चीवरुन खाली खेचले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH Karnataka: Congress MLCs in Karnataka Assembly forcefully remove the chairman of the legislative council pic.twitter.com/XiefiNOgmq
— ANI (@ANI) December 15, 2020
गोहत्या बंदी विधेयक सभागृहात सादर होणार होते. या विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावे, असा व्हिप काँग्रेसने सर्व सदस्यांसाठी काढले होते. आज सकाळी सभागृहाचे कामकाज चालू होताच काँग्रेस सदस्यांनी गोंधळ सुरु केला.
विधानपरिषदेचे उपसभापती सभापतींच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर काँग्रेस आमदारांनी यावर आक्षेप घेत या खुर्चीवर बसणे असंवैधानिक असल्याचा दावा केला होता. अशातच विधानपरिषदेतील काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचून बाहेर काढले. अखेर यामध्ये हाऊसमधील मार्शल्सना हस्तक्षेप करावा लागला.
दरम्यान, काही आमदार गुंडासारखे वागले. त्यांनी उपसभापतींसोबत गैरवर्तन केले. विधानपरिषदेच्या इतिहासात इतका लाजिरवाणा दिवस आम्ही बघितलेला नाही. लोक आमच्याबद्दल काय विचार करतील, तो विचार करुन मला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार लेहर सिंह सिरोया यांनी दिली.